अनिल परबांच्या बाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त क्लिपवर रामदास कदम म्हणतात…


मुंबई – शिवसेना नेत्यांनीच परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांना रसद पुरवल्याचा आरोप माजी आमदार संजय कदम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केला आहे. तसेच, यासंदर्भातील काही ऑडिओ क्लिप देखील समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच, शिवसेना नेते रामदास कदम व शिवसेनेचा कार्यकर्ता यांच्यातील संभाषणाची आणि त्या शिवसेना कार्यकर्त्याची व भाजप नेते किरीट सोमय्या यांची देखील ऑडिओ क्लिप समोर आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी यावर सर्व ऑडिओ क्लिप संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या सर्व क्लिपचा मी धिक्कार करतो, निषेध करतो. संजय कदम आणि वैभव खेडेकर यांना मोठे मी केले. संजय कदम यांचा माझ्या मुलाने विधानसभेत पराभव केला आहे. म्हणून हे दोघेही असे करत आहेत. माझे आणि अनिल परब यांचे संबंध अत्यंत मैत्रीचे आहेत. मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, मी सोमय्या यांना संपर्क साधला नाही. त्यांच्याशी माझा कधीच संबंध आला नाही किंवा त्यांना भेटलो नाही. हे राजकीय सुडबुद्धीने करत आहेत. संजय कदम आणि वैभव खेडेकर यांनी यापूर्वीसुद्धा अश्या क्लिप केल्या आहेत. याबाबत मी यापूर्वीच उच्च न्यायालयात दावा केला आहे. माझ्या पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे. मी पाठीत खंजीर खुपसण्याची भूमिका कधीच घेत नसल्याचे रामदास कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.

मी या सगळ्या ऑडिओ क्लिप्सचा धिक्कार करतो. त्याच्या अगोदर देखील या दोघांना माझ्यावर धादांत खोटे आरोप मागील पाच-सहा महिन्यांमध्ये जवळपास दहा पत्रकारपरिषदा घेऊन केलेले आहेत. मी याप्रकरणी उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केलेला आहे. हे दोघेही अतृप्त आत्मे आहेत. संजय कदम यांना माझ्या मुलाने विधानसभा निवडणुकीत पाडलेले आहे. माझा मुलगा आता तिथे आमदार आहे. दापोली मतदार संघात तिथे संजय कदम अगोदर आमदार होते. संजय कदम आणि वैभव खेडेकर या दोघांनाही मी मोठे केले आहे, त्यांचा मी राजकीय बाप आहे. वैभव खेडेकर यांची खेड नगरपरिषदेतील भ्रष्टाचारी मी अनेक प्रकरणे बाहेर काढलेली आहेत. म्हणून हे दोघे एकत्र येऊन मागील पाच-सहा महिन्यांपासून अनेक पत्रकारपरिषदा घेत आहेत. माझी बदनामी केली, त्यांच्यावर मी दावे ठोकले, ते दावे न्यायालयात सुरू असल्याचे रामदास कदम यांनी बोलून दाखवले आहे.

तसेच, अनिल परब आणि माझे संबंध अतिशय घट्ट मैत्रीचे आहेत. माझा मुलगा जिथे आमदार आहे, तेथील पालकमंत्री म्हणून नेहमी मदत करत असतात. म्हणून एका बाजूला पक्षाच्या माध्यमातून मला बदनाम करणे, पक्षश्रेष्ठीच्या मनात माझ्याबद्दल किलमीश निर्माण करणे आणि तिथे खेडमध्ये आपली राजकीय पोळी भाजून घेणे. हा एक कलमी कार्यक्रम या माध्यमातून पाहायला मिळत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

एका ऑडिओ क्लिपमध्ये तर मी किरीट सोमय्यांची पत्रकारपरिषद झाली की त्याला माझ्याकडे घेऊन ये, असेही सांगताना ऐकवल गेले आहे. माझ्या पक्षाच्या मूळावर जो माणूस उठला आहे. त्या माणसाला कुठलाही शिवसेनेचा नेता आपल्याकडे बोलावू शकतो का? ही साधी गोष्ट आहे. मागील विधानसभा निवडणुकीत देखील माझ्या आवाजाच्या अशाच व्हिडिओ क्लिप बनवल्या गेल्या आणि मुस्लीम समाजाला मी शिव्या घालत आहे म्हणून प्रत्येक मोहल्ल्यात त्या ऐकवल्या गेल्या, आमचे मतदान कमी करण्यासाठी. तेव्हा देखील मी पोलिसात तक्रार केली होती. किरीट सोमय्यांचा आणि माझा कधीच संबंध आलेला नाही. आमची कधी भेट नाही, बोलणे नाही, चर्चा देखील नाही. हे सगळे राजकीय हेतूने मला बदनाम करण्यासाठी आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी, विशेषता रामदास कदमवर आपण बोललो की संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला प्रसिद्धी मिळते, हे मागील काही महिन्यांमध्ये त्यांच्या लक्षात आलेले आहे. म्हणून सातत्याने हे सुरू आहे. या अगोदर देखील मी त्यांच्याविरोधात दावे दाखल केलेले आहेत. आता याप्रकरणी देखील मी त्यांच्याविरोधात न्यायालयात जाणार आणि यांच्याविरोधात दावा ठोकणार असल्याचे रामदास कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.