महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटावरुन जितेंद्र आव्हाड यांनी नोंदवला आक्षेप


२ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेवर चित्रपट करत असल्याचे महेश मांजरेकर यांनी जाहीर केले आहे. महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीच्या मुहूर्तावर महेश मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामला चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. महेश मांजरेकरांच्या या नव्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील आक्षेप नोंदवला आहे. ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचे योगदान काय? अशी विचारणा केली आहे. तसेच लोकांचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेले नाटक असल्याचा आरोपही केला आहे.