ट्रॅफिक सिग्नलविषयी मनोरंजक माहिती


आज कोणत्याही जरा मोठ्या शहरात रस्त्यात ट्रॅफिक सिग्नल दिसतात. रस्त्याने येजा करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या ट्रॅफिक सिग्नलची खास दखल घ्यावी लागते कारण ट्रॅफिकसाठी असलेले नियम मोडले तर दंड भरावा लागतो. ट्रॅफिक सिग्नलचा मुख्य उद्देश वाहतूक सुरळीत राहावी आणि सुरक्षित असावी असा आहे. या ट्रॅफिक सिग्नलचा इतिहास मोठा मनोरंजक आहे.

जगातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल ५ ऑगस्ट १९१४ ला अमेरिकेतील ओहिओ क्वीन्सलंड मध्ये लावला गेला. पोलीस अधिकारी लेस्टर वायरने १९१२ मध्ये याच गावात ट्रॅफिक सिग्नल सिस्टीम सर्वप्रथम तयार केली होती. त्यावेळी त्यात फक्त हिरवा आणि लाल असे दोन रंगाचे दिवे होते. ट्रॅफिक सिग्नलमध्ये पिवळ्या रंगाचा दिवा नंतर आला. दिव्याचा रंग बदलण्यापूर्वी बझर वाजत असे. अमेरिकन ट्रॅफिक सिग्नल कंपनीने त्यानंतर अनेक शहरात ट्रॅफिक सिग्नल सिस्टीम तयार केली.

ब्रिटनमध्ये गॅसवर चालणारा आणि हाताने ऑपरेट करायचा ट्रॅफिक सिग्नल १८६८ मध्ये लंडन येथे ब्रिटीश संसदेबाहेर बसविला गेला होता. पण तो सुरु करताना एक महिन्यात तो फुटला आणि त्यात एक पोलीस घायाळ झाला होता. रेल्वे इंजिनिअर जे.पी. नाईट याने तो तयार केला होता. युरोपियन पेटंट ऑफिस कडे ट्रॅफिक लाईट संदर्भात ५ हजाराहून अधिक संशोधनाची यादी असून अमेरिकेतील सर्वात जुने पेटंट १ जानेवारी १९१८ ला घेतले गेले असून ते जे.बी. हॉज यांच्या नावावर आहे.

१९२८ मध्ये जे ट्रॅफिक लाईट वापरले गेले ते चालकाने नुसता हॉर्न वाजविला तरी सुरु होत. पण नागरिकांना हॉर्नच्या आवाजाचा त्रास होऊ लागल्याने ते हटविले गेले. ब्रिटन मध्ये तीन रंगाचे ट्रॅफिक सिग्नल १९२५ मध्ये सुरु झाले आणि पहिला ऑटोमेटिक सिग्नल १९२७ मध्ये सुरु झाला. ट्रॅफिक सिग्नलमध्ये तीन रंगाचे दिवे वापरण्याची कल्पना रेल्वे सिग्नल वरून घेतली गेली असे सांगतात.

Leave a Comment