नवी दिल्ली – देशातील कोरोना लसीकरण मोहिमेने एकीकडे वेग घेतला असला तरी दुसरीकडे अद्यापही कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत नसल्याचे चित्र सध्याच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 24 हजार 354 नव्या कोरोनानाबाधितांची नोंद झाली आहे, तर 234 बाधितांचा मृत्यु झाला आहे. त्याचबरोबर देशातील सक्रिय बाधितांच्या संख्येत हळूहळू घट होत असल्याचे दिसत असून सक्रिय रुग्णांची संख्या आता 2 लाख 73 हजार 889 एवढी झाली आहे.
काल दिवसभरात देशात 24 हजार रुग्णांची नोंद, तर 234 जणांनी गमावला जीव
दरम्यान देशातील कोरोना लसीकरण मोहिमेने वेग घेतला असून काल दिवसभरात कोरोनाचे 69 लाख 33 हजार 838 डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत एकूण 89 कोटी 74 लाख 81 हजार 554 एवढे डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी एकट्या केरळमध्ये 13 हजार 834 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 95 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांनंतर केरळमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे पहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात राज्यात 3,105 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 50 बाधितांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात 3 हजार 164 बाधित कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 74 हजार 892 बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.27 टक्के आहे.