ई-स्वरूपात महात्मा गांधी संकलित वाङमयाचे आज प्रकाशन


मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या महात्मा गांधी संकलित वाङमय भाग-1 च्या 1 ते 50 खंडांचे ई- स्वरुपात प्रकाशन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव सांस्कृतिक कार्य सौरभ विजय हे असतील. हे साहित्य पेनड्राईव्ह स्वरुपात प्रथमच प्रकाशित होत आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हे प्रकाशन ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे.

या खंडांमध्ये महात्मा गांधीजींचे स्फूर्तिदायक जीवन, त्यांचा व्यक्तिविकास, त्यांनी केलेली विविध कार्ये, त्यांची भाषणे, लेख व पत्रसंग्रह अशा विपुल साहित्याचा समावेश आहे. याद्वारे महात्मा गांधींचे जीवन जवळून पाहण्याची संधी वाचकांना उपलब्ध होईल. संशोधक, साहित्यिक, विद्यार्थी अशा समाजघटकांना या साहित्याचा बहुमोल उपयोग होईल अशी आशा दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दि.प्र.बलसेकर यांनी व्यक्त केली आहे.