कंगणा राणावत उत्तर प्रदेशच्या ODOP मोहिमेची झाली ब्रँड अॅम्बेसेडर


लखनौ – आधी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर लॉकडाउनच्या काळात सत्ताधारी शिवसेनेसोबत उघड वाद करणारी अभिनेत्री कंगना राणावत आता उत्तर प्रदेश सरकारच्या एका महत्त्वाच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर झाली आहे. कंगनाने शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा उत्तर प्रदेश सरकारकडूनच करण्यात आली आहे. कंगना राणावतने प्रमुख भूमिका साकारलेला थलैवी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर कंगनाने लागलीच पुढच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे. कंगनाने शुक्रवारी चित्रीकरण संपवून थेट लखनौ गाठले आणि तिथे योगी आदित्यनाथ यांच्यासोबत तिची भेट झाली.

शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांची कंगनाने त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून कंगनाला ODOP ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आले. कंगनाची निवड ODOP अर्थात वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या मोहिमेसाठी करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये उत्तर प्रदेशमधील स्थानिक कारागिरीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याची विशेष हस्तकला किंवा कारागिरी त्या जिल्ह्याची विशेषता म्हणून लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.


उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यांमध्ये तयार होणाऱ्या चिकनकारी, झारी झरदोझी, काला नमक राईस अशा अनेक गोष्टी इतर कुठेही होत नसल्याचा राज्य सरकारचा दावा आहे. योगी आदित्यनाथ यांनी या भेटीदरम्यान कंगनाला एक विशेष वस्तू भेट म्हणून दिली आहे. त्यांनी कंगनाला अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी वापरण्यात आलेले नाणे दिले आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत कंगनाने ही माहिती दिली आहे. तसेच, हा शुभशकुन असल्याचे देखील म्हटले आहे.