‘मर्क’ला मान्यता मिळाली, तर ठरणार कोरोनावरील उपचारासाठीची पहिली गोळी


वॉशिंग्टन : कोरोनावरील उपचारासाठी मर्क कंपनीने एक गोळी तयार केली असून तिच्या प्रायोगिक चाचण्यांमध्ये रुग्णालयात दाखल होणे व मृत्यू होणे यात घट झाली आहे. निम्म्याने ही घट झाली असून त्यामुळे आशादायी असे चित्र निर्माण झाले आहे. या गोळीला अमेरिका व जगातील इतर देशांनी कोरोना उपचारासाठी परवानगी द्यावी, यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे.

जर या गोळीला मान्यता मिळाली तर कोरोनावरील उपचारासाठीची ही पहिली गोळी ठरणार आहे. कोरोनावर उपचारासाठी आतापर्यंत अमेरिका व इतर सर्वच ठिकाणी इंजेक्षनचा वापर करण्यात येत आहे. जी औषधे सध्या दिल्याचे सांगण्यात येते, ती प्रत्यक्षात कोरोनावरील औषधे नसून विषाणूजन्य रोगावरील औषधे आहेत, त्यांचा वापर कोरोनावर करण्यात येत आहे. दरम्यान अशी गोळी पहिल्यांदाच तयार केली आहे.

दरम्यान दोन औषधांचा संमिश्र वापर कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रभावी ठरू शकतो, असे काही प्रयोगातून दिसून आले आहे. प्राण्यांमध्ये हे प्रयोग यशस्वी झाले आहेत. ‘व्हायरसेस’ या नियतकालिकात म्हटले आहे, की विषाणूविरोधी दोन औषधे नॅफॅमोस्टॅट व पेगॅसिस यांचा वापर एकाच वेळी केला, तर विषाणूचा प्रतिबंध होऊ शकतो. नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेचे प्राध्यापक डेनीस कैनोव यांनी म्हटले की, एकाच वेळी या औषधांचा वापर केल्यास विषाणूला प्रतिबंध होऊ शकतो.