अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेले बघायचे आहे; खासदार अमोल कोल्हे


पुणे : अजितदादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेले मला बघायचे आहे, हीच भावना ठेऊन त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणे हे प्रत्येक कार्यकर्त्यांचे कर्तव्य असल्याचे वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. कोल्हे यांनी हे वक्तव्य पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत केले आहे.

पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता त्यांचे ऋण फेडण्याची वेळ आल्याची कोल्हे म्हणाले. तसेच शरद पवारांना देशाच्या पंतप्रधानपदी पाहायचे असेल, तर त्या माझ्या सर्वोच्च नेत्याला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये. यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण साहेबांना दाखवून दिली पाहिजे, असे आवाहन ही कोल्हे यांनी यावेळी केले.

अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, तुम्ही माझ्यासाठी जीवाचे रान केले, माझ्यासाठी पायाला भिंगरी लावून पळालात. आता तुमच्यासाठी काहीतरी करण्याची माझी वेळ आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार हे लक्ष घालत आहेत. आपल्याला त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे, ही भाग्याची गोष्ट आहे. पण जर देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवारांना पाहायचे असेल, तर त्या माझ्या सर्वोच्च नेत्याला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये, असे ते म्हणाले. हीच गोष्ट राज्यपातळीवर अजित पवारांच्या बाबतीत आहे.

अजित पवारांच्या सोबत शिरुरच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन कार्यक्रमाला होतो. त्या इमारतीचा कोपरा ना कोपरा ते पाहत होते. त्यांना न्याहाळत मी होतो. मनात त्यावेळी विचार आला की, अजितदादांनी याच पद्धतीने पिंपरी चिंचवड शहराची सूत्रे हातात असताना येथील प्रत्येक गोष्ट न्याहाळली असेल. हा योग पुन्हा पिंपरी चिंचवड शहरात कधी येणार? पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेले बघायचे आहे, ही माझी भावना असल्याचे ते म्हणाले.

कोल्हे पुढे म्हणाले की, पिंपरी चिंचवडसाठी अजित पवार यांनी अनेक गोष्टी केल्या आहेत. त्याच्या ऋणातून उतराई होण्याची वेळ असते. अजित पवारांच्या कुशल नेतृत्वात पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. आता दादांना आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काहीतरी देण्याची वेळ आली आहे. त्या नेतृत्वाकडून आणखी अपेक्षा करण्यापेक्षा त्या नेतृत्वाला आणखी बळ देण्याची गरज असल्याचेही अमोल कोल्हे म्हणाले.