धर्मांतरण प्रकरण; यवतमाळच्या धीरज जगतापच्या उत्तर प्रदेश एटीएसने आवळल्या मुसक्या


कानपूर : सध्या धर्मांतराचा विषय उत्तर प्रदेशमध्ये चर्चेत असतानाच आता या प्रकरणात आणखीन एक अटक उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने केली आहे. धीरज जगताप असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो महाराष्ट्राच्या यवतमाळमधील राहणार आहे. उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने कानपूरमधून धीरज जगतापला अटक केली आहे.

20 जून रोजी अवैधरित्या धर्मांतर करणाऱ्यांच्या विरोधात उत्तर प्रदेशमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. याचा तपास उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाकडून सुरु झाला. या प्रकरणात देशभरातून 14 लोकांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाकडून मौलाना उमर गौतम, मौलाना कलीम सिद्दिकी सोबत महाराष्ट्र नेटवर्कच्या रामेश्वर कावडे उर्फ आदम उर्फ एडम भुप्रिया बंदो उर्फ अरसलान मुस्तफा आणि कौशर आलम या प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली.

उत्तरप्रदेश दहशतवादी पथकाच्या रडारवर तपास सुरु असतानाच धीरज जगतापचे नाव आले. दहा वर्षांपूर्वी धीरज जगतापने धर्म बदलून इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि तो तेव्हापासूनच अवैधरित्या धर्मांतरण करण्याच्या कार्यात सामील होता. धीरज जगताप हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रसाद कांवरे, कौसर आलम आणि अर्सलान यांच्या संपर्कात होता.

धीरजकडून अवैधरित्या धर्मांतरण करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप बनविण्यात आले होते. ज्यांची नावे REVERT,REHAB आणि DAWAH अशी होती. धीरज आणि इतर आरोपींकडून या व्हॉट्सअप ग्रुप द्वारे इतर धर्माबद्दल द्वेष पसरवणे, खोटी आश्वासने देऊन आणि प्रलोभने देऊन लोकांना इस्लाम धर्म कबूल करण्यास भाग पाडण्याच काम केले जात होते. तसेच त्या व्हॉट्सअप ग्रुपवर कट्टरपंथी संदेश सुद्धा पाठवले जात असल्याची माहिती उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाला मिळाली.

अवैधरित्या धर्मांतराचा रॅकेट धीरज आणि इतर आरोपी मिळून देशभरात चालवत होते. या रॅकेटचा धीरज सुद्धा एक महत्त्वाचा सदस्य होता. लोकांना मदत करण्याचा आश्वासन देऊन, त्यांना इतर गोष्टींचा आमिष दाखवून त्यांचे धर्मांतरण केले जात होत. धर्मांतर करण्यासाठी कायदेशीर बाबींच्या गोष्टींची पूर्तता प्रकाश कावरे हा करायचा. त्याचबरोबर धीरज जगतापने काहींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे वरिष्ठ आयएएस अधिकारी यांचे सुद्धा त्यांच्या सरकारी निवासस्थानी धर्मांतरण सुरु असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. उत्तर प्रदेश सरकारकडून याची चौकशी केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात या प्रकरणात अजून काय कारवाई केली जाते, ते आगामी काळात स्पष्ट होईल.