डिसेंबर २०२१पर्यंत एअर इंडियाची ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत

एअरइंडियाने सिनियर सिटीझन्स साठी खास ऑफरची घोषणा केली असून डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत स्थानिक उड्डाण प्रवासात तिकिटाच्या बेसिक किमतीवर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. देशातील एअर इंडियाच्या सर्व रुट वर ही सवलत मिळणार आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना किमान तीन दिवस अगोदर बुकिंग करावे लागणार आहे.

६० वर्षाच्या पुढचे नागरिक त्यासाठी पात्र आहेत आणि फक्त स्थानिक उड्डाणासाठी आणि इकॉनॉमी क्लास प्रवासासाठी ही सवलत मिळणार आहे. त्यासाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. जन्मतारखेसह फोटो ओळखपत्र द्यावे लागणार आहे. असे ओळखपत्र नसेल तर प्रवासाचे पूर्ण भाडे भरावे लागणार आहे. ही योजना डिसेंबर २०२० पर्यंत होती ती डिसेंबर २०२१ पर्यंत सुरु राहणार आहे. सिनिअर सिटीझन सोबत लहान मुले प्रवास करत असतील तर मुलांचे पूर्ण तिकीट काढावे लागणार आहे असे समजते. या योजनेचे नियम वेबसाईटवर दिले गेले आहेत.