चोऱ्या करण्यासाठी ही घरे बेस्ट, शातीर चोरांनीच केला खुलासा

कोणतेही वर्तमानपत्र उघडले की घरफोडीच्या काही बातम्या वाचायला मिळणारच अशी सध्याची परिस्थिती आहे. स्वतंत्र बंगले, मोठ्या सोसायट्या किंवा फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना आपल्या घरी चोरी होईल अशी सतत भीती असते. खरे तर प्रत्येकजणच आपले घर चोरांपासून सुरक्षित राहावे यासाठी विशेष काळजी घेत असतो. चांगल्या प्रतीची कुलुपे, खास प्रकारची लॉक, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा अलार्म, कुत्रे पाळणे असे अनेक उपाय त्यासाठी केले जातात. मात्र तरीही चोऱ्या होतात आणि जगभर कुठेही घरफोड्या होतात.

चोर कुठली घरे चोरी करण्यासाठी जास्त पसंत करतात याची एक यादी सुरक्षातज्ञांनी केली असून safe.co.uk वेबसाईटवर ती उपलब्ध आहे. विशेष म्हणजे घरफोड्या करणाऱ्या आणि आता या व्यवसायाला रामराम ठोकलेल्या शातीर म्हणजे कुशल चोरांशी चर्चा करून ही माहिती या सुरक्षा तज्ञांनी मिळविली आहे. त्यासाठी या चोरांच्या मुलाखती घेतल्या गेल्या आहेत.

या चलाख चोरांनी दिलेल्या माहितीनुसार रिकामी घरे त्यांची पहिली पसंती असते. बरेचदा घरांवर पाळत ठेऊन घरातील लोकांच्या बाहेर जाण्या येण्याच्या वेळा पहिल्या जातात. घरातील लोक सुटीसाठी बाहेरगावी गेले असतील तर अश्या घरात चोऱ्या करण्याला प्राधान्य दिले जाते. कुत्री असलेली घरे शक्यतो टाळली जातात. तसेच घराच्याबाहेर दिवा असेल तर अशी घरे टाळली जातात. घराबाहेर थोडा अंधार असलेली, शेजारी नसलेली, आसपास खूप वस्ती नसलेली घरे चोर प्रथम निवडतात.

घराबाहेर पडलेले सामान, वर्तमानपत्रे यावरून घरातील लोक बाहेर गेले आहेत किंवा बेपर्वा आहेत हे समजू शकते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर टेक सॅव्ही चोरटे हुशारीने करून घेतात. सोशल मिडिया त्यासाठी आदर्श मार्ग आहे. अनेकांना सतत आपले फोटो आणि स्टेट्स अपडेट करायची सवय असते. त्यावरून हे हुशार चोर कुठले लोक घराबाहेर, दुसऱ्या ठिकाणी गेले याचा अचूक अंदाज बांधतात आणि पाळत ठेऊन अशी घरे साफ करतात.

उन्हाळा हा चोरांचा आवडता सिझन. या काळात अनेक लोक सुट्टीवर जातात. काचेची मोठी दारे, खिडक्या असलेली घरे चोरीसाठी थोडी सहज सोयीची असतात. होम सिक्युरिटी सिस्टीम, सीसीटीव्ही या गोष्टी आता चोरांना फारश्या रोखू शकत नाहीत कारण त्या निकामी करण्याची कला या चोरांना अवगत असते असेही या माजी चोरांचे म्हणणे आहे.