पहेला नशा फेम आयेशा जुल्का पुन्हा पडद्यावर येणार

नव्वदच्या दशकात बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्री मधली एक आयेशा जुल्काची ओळख पहेला नशा फेम अभिनेत्री अशी आहे. करियर ऐन भरात असताना अचानक आयेशाने चित्रपटापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याप्रमाणे ती पडद्यावरून गायब झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा ती पडद्यावर झळकणार आहे. ‘व्हेअर आर दे’ वेबसिरीज मधून ती पुन्हा चाहत्यांच्या भेटीस येत आहे.

सलमानखान बरोबर कुर्बान चित्रपटात प्रथम दिसलेली आयेशा वास्तविक चाईल्ड आर्टिस्ट म्हणून अगोदरच पडद्यावर आली होती.१९८३ मध्ये कैसे कैसे लोग मधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र १९९० च्या दशकात ती लोकप्रिय अभिनेत्रीच्या यादीत सामील झाली. तिचा साधेपणा चाहत्यांना भुरळ घालत असे. खिलाडी, जो जीता वही सिकंदर असे अनेक सुपरहिट चित्रपट तिने दिले आहेत. मात्र एकसारख्या भूमिका वारंवार मिळू लागल्याने तिने अभिनय क्षेत्रापासून दूर व्हायचा निर्णय घेतला आणि बांधकाम व्यावसायिक समीर वाशी यांच्याबरोबर लग्न करून नवीन आयुष्य सुरु केले.

त्यानंतर तिने पतीसमवेत व्यवसाय सुरु करून त्यात चांगलेच यश मिळविले आहे. आता मात्र पुन्हा एकदा ती अभिनय करणार आहे. हिंदी बरोबरच तिने तमिळ, तेलगु आणि कन्नड चित्रपटात सुद्धा भूमिका केल्या आहेत. अक्षयकुमार, नाना पाटेकर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत तिच्या अफेअर्सची चर्चा काही काळ सुरु होती.