अंतराळात मृत्यू आल्यास असे होतात अंत्यसंस्कार

अंतराळप्रवास आता फारशी नवलाची गोष्ट राहिलेली नाही. आता तर जग अंतराळ पर्यटनाच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि अनेक खासगी कंपन्या प्रवाशांना अंतराळ सफर घडविण्यासाठी सज्ज आहेत. समजा अंतराळवीरांना अंतराळ मोहिमेवर असतानाच मृत्यू आला तर त्यांच्या शवावर अंत्यसंस्कार होतात का किंवा कसे होतात याचा फारसा विचार आपण करत नाही. पण अंतराळवीर टेरी विर्त्झ यांनी या बाबत माहिती दिली आहे.

टेरी म्हणतात, अंतराळात मृत्यू येणे यासारखी दुसरी वाईट गोष्ट नाही. कारण स्पेसक्राफ्ट मध्ये मृतदेह स्टोअर करण्याची व्यवस्था नसते आणि मिशन पूर्ण होईपर्यंत वाट पाहणे शक्य नसते. त्यामुळे मृतदेह एअरलॉक पॅक मध्ये भरून अंतराळात सोडला जातो. बाहेरील अति थंड तापमानामुळे त्याची आईस ममी बनते. हा उलगडा नासाच्या अपोलो मिशन मध्ये स्पेस सुटची चाचणी घेताना झाला होता. काही वेळा स्पेस प्रेशर मुळे डेड बॉडीत स्फोट होऊ शकतो.

अंतराळात गुरुत्वाकर्षण नाही. त्यामुळे तेथे सोडलेले मृतदेह अनंत काळ तरंगत्या अवस्थेत राहतात. अंतराळ अनंत आहे त्यामुळे हे देह लाखो करोडो वर्षे राहू शकतात. स्पेस मिशन मध्ये एखाद्याचा मृत्यू झाला तर देह पृथ्वीवर आणण्यासाठी काही महिने लागू शकतात त्यामुळे त्याची विल्हेवाट अंतराळात लावण्याशिवाय अन्य मार्ग नसतो. मंगळावर असे मृतदेह दफन करता येतील का यावर संशोधन सुरु आहे.

स्वीडिश कंपनी प्रोमेसा अंतराळ शवपेट्या बनविण्याबाबत काम करत आहे. डेड बॉडी बर्फाचे क्रिस्टल असलेल्या फ्रीज ड्राय टॅब्लेट मध्ये सुरक्षित ठेवता येणे शक्य आहे पण पृथ्वीवर हे मृतदेह आणणे सोयीचे नाहीच. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ३ अंतराळवीरांना अंतराळात मृत्यू आलेला आहे.