देशात काल दिवसभरात 27 हजार रुग्णांची नोंद, तर 277 जणांनी गमावला जीव


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा आलेख वर जाताना दिसत आहे. कारण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 26 हजार 727 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 277 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर काल दिवसभरात 28 हजार 246 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी एकट्या केरळमध्ये 15 हजार 914 रुग्णांची नोंद झाली असून 122 जणांचा मृत्यू झाला आहे. काही केल्या केरळमधील बाधितांची संख्या कमी येत नाही ही चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर देशातील कोरोना लसीकरण मोहिमेने आता चांगलाच वेग घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. देशात आतापर्यंत एकूण 89 कोटीहून जास्त डोस देण्यात आल्याची नोंद झाली आहे. काल एकाच दिवसात देशात 64 लाख 40 हजार 451 डोस देण्यात आले.

दरम्यान महाराष्ट्रात काल दिवसभरात 3,063 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 56 जणांनी आपला जीव गमावला आहे. काल दिवसभरात 3 हजार 198 बाधित कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत राज्यात 63 लाख 71 हजार 728 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.27 टक्के आहे.