महाराष्ट्रातील पर्यावरणाच्या समस्यांवर भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोचले सर्वपक्षीय नेत्यांचे कान


मुंबई – मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात वन्यजीव सप्ताह २०२१ चा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आपली भूमिका स्पष्ट केली. पण, मुख्यमंत्र्यांनी हे सांगतानाच पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जशी जनजागृती केली जाते, तशीच राजकीय नेत्यांचीही जनजागृती व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि सरकारमधील ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबतच वनविभागाचेही अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमावेळी आपली भूमिका मांडली आहे. सध्या मुख्यमंत्र्यांकडेच वनखात्याचा कारभार असल्यामुळे वनमंत्री या नात्याने मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्वच राजकीय नेत्यांचे कान टोचले. पर्यावरण, वनसंरक्षण याबद्दल जनजागृती झाली पाहिजे. पण त्यासोबतच राजकीय नेत्यांचीही जागृती झाली पाहिजे. आपण आपल्या सोयीप्रमाणे अनेकदा कायदे बनवतो आणि ते नियम पायदळी तुडवत असतो. हाताने कायदे करायचे आणि पायदळी तुडवायचे. आपण आपल्या सोयीप्रमाणे कायद्याचे अर्थ लावत असतो आणि बदलत असतो. त्यात काही वेळा मोकळीक देत असतो. विकासाचे वेड स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेमका कसला विनाश करत आहोत, ते न बघता आपण पुढे जात असतो, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना गुरुवारी मंजूर झालेल्या सीआरझेडच्या सागरी किनारा व्यवस्थापन आराखड्याला मंजुरी मिळाल्यासंदर्भात देखील भूमिका मांडली. आपण नवीन वस्त्या उभारताना मूलभूत सुविधा कशा देणार? माझा विकासाला अजिबात विरोध नाही. सीआरझेडच्या कायद्यात शिथिलता आणल्यानंतर बिल्डरांनी मोकळा श्वास सोडला. पण या इमारती बांधत असताना त्यासाठीचे पाणी, मलनि:स्सारण कसे करणार?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

सर्वसामान्यपणे असे मानले जाते की, जिथे जंगल जास्त असतं, तिथे जास्त पाऊस पडतो. आम्ही शाळेत होतो, तेव्हा सर्वात जास्त पाऊस चेरापुंजीला पडायचा. त्या प्रश्नाचे उत्तर आता १०० टक्के चुकीचे ठरेल. कारण प्रत्येक मोसमात आजपर्यंतचा सर्वात जास्त पाऊस पडतो. आता चेरापुंजीचे नावच नाही येत. मुंबईत, मराठवाड्यात, कोकणात सगळ्यात जास्त पाऊस पडला. हे का घडत आहे? जी वृक्षतोड आपण करत आलो आहोत, ती कुठेतरी थांबणार आहे की नाही. आपण आता स्वत:ला पृथ्वीचे मालक समजायला लागलो आहोत. निसर्गाचा नियम आता कुणीच पाळत नसल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, आपल्याला सातत्याने निसर्ग इशारे देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आपल्याला निसर्ग सांभाळायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा अतिशयोक्ती होते, तेव्हा मात्र निसर्ग कठोर रूप धारण करतो. निसर्गाचा निर्णय भयानक असतो. तिथे दया-माया दाखवली जात नाही. मग पूर येतो, अतिवृष्टी होते, कोरोनासारखं संकट येते. आपण निसर्गनियम बघतच नाही. निसर्ग आपल्याला संकेत, इशारे देत असतो. पण जेव्हा आपण त्यावर अतिक्रमण करतो, तेव्हा निसर्ग त्याच्या पद्धतीने दूर करत असल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.