अॅपल वॉच बनले या तरुणासाठी तारणहार

आपण बऱ्याच वेळा इलेक्ट्रॉनिक गॅजेट, हौस म्हणून किंवा शौक म्हणून विकत घेतो पण त्यातील फिचर्सची माहिती बरेचवेळा करून घेत नाही. अनेकदा अशी गॅजेट आपल्यासाठी तारणहार बनू शकतात याचे प्रत्यय अलीकडे येऊ लागले आहेत. सिंगापूर मधील २४ वर्षीय विद्यार्थी मोहम्मद फित्री याच्यासाठी त्याचे अॅपल वॉच असेच जीवदान देणारे ठरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद बाईक चालवीत असताना त्याची व्हॅन बरोबर धडक झाली आणि मोहम्मद खाली कोसळला. तो बेशुध्द पडला मात्र त्याच्या हातातील अॅपल स्मार्टवॉच त्वरित कार्यान्वित झाले. या घड्याळाने मोहम्मदची हालचाल ट्रॅक केली आणि पडल्यावर काही काळ हालचाल झाली नाही हे ओळखून एखाद्या सच्च्या मित्राप्रमाणे त्याचा जीव वाचविण्यासाठी कृती केली. मोहम्मद बाईक वरून पडतानाची हलाचाल या घड्याळाने रेकॉर्ड केलीच होती पण तो हालचाल करत नाही हे पाहताच घड्याळातील ऑटो प्रोग्रामिंग कार्यान्वित झाले. त्यानुसार प्रथम इमर्जन्सी सर्व्हिस कॉल लावला गेला आणि त्या पाठोपाठ त्याच्या प्रायमरी कॉन्टॅक्टना फोन केले गेले.

द सनच्या रिपोर्ट नुसार मोहम्मदच्या कुटुंबियांनी सांगितले की मोहम्मद रस्त्यात कोसळला तेव्हा तिथे कुणीच नव्हते पण त्याच्या अपघाताची सूचना स्मार्ट वॉच मुळे मिळाली. सिंगापूर सिव्हील डिफेन्स फोर्स नुसार रात्री ८.२० च्या सुमारास अपघाताची सूचना मिळताच मोहम्मदला त्वरित हॉस्पिटल मध्ये हलविले गेले त्यामुळे त्याचे प्राण वाचले.

अॅपल स्मार्टवॉचच्या चौथ्या सिरीज मध्ये हे खास फिचर आहे. युजरच्या बॉडी मुव्हमेंट सह अचानक पडणे हे घड्याळ ओळखते आणि तसा अलार्म देते. १ मिनिट शरीराची हालचाल झाली नाही तर इमर्जन्सी सर्व्हिस ला फोन होतो तसेच खास कॉन्टॅक्टना फोन लागतो. सॅमसंग गॅलेक्सीच्या वॉच ३ मध्येही हे फिचर दिले गेले आहे.