या कंपन्या कर्मचाऱ्यांना ऑफिस मध्ये बोलाविण्याचा तयारीत
भारतात करोनाची दुसरी लाट थोडी मंद झाली आहे आणि लसीकरण चांगल्या प्रमाणात झाले असल्याच्या पार्श्वभूमीवर कॉर्पोरेट जगतातील काही दिग्गज कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलाविण्याचा तयारीला लागल्या आहेत. म्हणजेच वर्क फ्रॉम होम कल्चर आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे असे संकेत मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वीच टीसीएसचे सीईओ राजेश गोपिनाथन यांनी या वर्षअखेर त्यांचे ९० टक्के कर्मचारी कार्यालयात येऊ लागतील असे सांगितले आहे. २५ टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा पर्याय दिला जाणार आहे. विप्रो, इन्फोसिस या आयटी फर्म सुद्धा कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्याच्या तयारीला लागल्या आहेत.
लिंकडेनच्या सर्व्हेक्षणातून असे दिसून आले आहे की अधिकांश भारतीय कंपन्या वर्क लाईफ बॅलन्स राहावा म्हणून हायब्रीड वर्कची गरज व्यक्त करत आहेत. व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राहण्यास त्यामुळे मदत होणार आहे. ‘फ्युचर ऑफ वर्क स्टडी २०२१ ’ नावाखाली हे सर्व्हेक्षण केले गेले आहे. त्यात १० मधल्या ९ उत्तरात हायब्रीड वर्क लाईफ बॅलन्सचा प्रभाव दिसून आला.
डिलाईटच्या अन्य एका सर्व्हेक्षणात ८४ टक्के भारतीयांनी कार्यालयात जाऊन काम करण्यास पसंती दर्शविली आहे. बँकिंग, वित्त सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी सुद्धा या वर्षअखेरी ९० टक्के कर्मचारी कार्यालयात येऊ लागतील असे सांगितले आहे. कोटक महिंद्र, एचडीएफसी, यस बँक, अॅक्सिस बँक यांनी लसीकरण झालेले कर्मचारी कार्यालयात येतील असे स्पष्ट केले आहे तर नेस्ले, टाटा कंन्झ्यूमर, एमवे, डाबर, गोदरेज कंझ्युमर या कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम आणि ऑफिस असे हायब्रीड मॉडेल निवडले आहे.