माही धोनीचे बॅट शिवाय शतक
टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनीने प्रतिष्ठित अश्या टी २० लीग मध्ये आयपीएल फ्रँचायझी साठी १०० कॅच घेऊन नवीन रेकॉर्ड स्थापन केले आहे. बॅट हातात न धरताच धोनीने असे शतक करणारा पहिला खेळाडू बनण्याची कामगिरी केली आहे. गुरुवारी शारजा येथे खेळल्या गेलेल्या चेन्नई विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात धोनीने कॅचचे शतक केले. हैद्राबादला ६ विकेटने हरविताना माहीने टीमला प्ले ऑफ मध्ये पोहोचणारी पहिली टीम बनविले आणि आणखी एका रेकॉर्डची नोंद केली.
आयपीएलच्या या ४४ व्या सामन्यात धोनीने रविंद्र जडेजा याच्या ओव्हर मध्ये रिद्धीमान साहा याचा कॅच घेऊन १०० कॅच पुरे केले. धोनी पाठोपाठ चेन्नई सुपरकिंगचा सुरेश रैना ९८ तर मुंबई इंडीयन्सचा कायरन पोलार्ड ९४ कॅच घेऊन दोन आणि तीन नंबरवर आहेत. आयपीएल मध्ये विकेटकिपर म्हणून सर्वाधिक खेळाडू औट करण्यात धोनी टॉप वर आहेच. त्याने २१५ सामन्यात १५८ फलंदाजांना औट केले आहे. या टी २० लीग मध्ये त्याने ११९ कॅच आणि ३९ स्टंप केले आहेत. एकाच पारी मध्ये तीन कॅच घेण्याची कामगिरी धोनीने १० वेळा बजावली आहे.