पणजी – उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असणाऱ्या शिवसेनेने आता गोवा विधानसभेच्या निवडणुकीमध्येही उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा विधानसभेच्या ४० जागांपैकी २२ जागांवर शिवसेना उमेदवार देणार असल्याची घोषणा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राऊत यांनी ही घोषणा बुधवारी केली. तसेच गोव्यामध्ये शिवसेनेचे सरकार आले, तर महाराष्ट्रामधील प्रशासनाप्रमाणे गोव्यामध्येही चांगली कामगिरी करणारे सरकार शिवसेना देईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर कोलकात्यामधील तृणमूल काँग्रेस गोव्यामध्ये निवडणूक लढू शकते, तर महाराष्ट्रातील शिवसेना गोव्यातील निवडणुकीमध्ये उमेदवार देऊच शकते, असे राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेना महाराष्ट्रामधील प्रशासनाप्रमाणे गोव्यामध्येही चांगली कामगिरी करणारे सरकार देणार – संजय राऊत
२२ जागांवर शिवसेना निवडणूक लढणार आहे. या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. कोणत्याही युतीची आम्हाला गरज नाही. आमची पक्षबांधणी उत्तम आहे. तर कोलकात्यामधील तृणमूल गोव्यात निवडणूक लढवू शकते, तर महाराष्ट्र गोव्याच्या बाजूलाच आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये कशी कामगिरी केली हे तुम्ही पाहू शकता, असे राऊत यांनी गोव्यातील डम्बोलिम विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. शिवसेना ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम करत आहे, त्याच पद्धतीने आम्ही गोव्यात काम करु. शिवसेना आणि गोव्याचे भावनिक नाते असल्याचे राऊत म्हणाले.
आमच्याकडे गोव्यामधील कोणत्याही पक्षाने युतीसंदर्भात विचारणा केली नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. पण त्याचवेळी गोवा फॉर्वड पक्षाचे विजय सरदेसाई आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्याचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांची आपण गोवा दौऱ्यादरम्यान भेट घेणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. विजय सरदेसाई, वेलिंगकर यांची मी भेट गेणार आहे. नवे आणि जुने पक्ष कार्यकर्ते या दौऱ्यात मला भेटणार असल्याचे राऊत म्हणाले.