पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसल्याच्या मुद्यावरुन कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला घरचा आहेर


नवी दिल्ली : अंतर्गत कलह देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये उफाळण्याची पुन्हा शक्यता निर्माण झाली असून पंजाबमधील मुख्यमंत्री बदलानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झाली असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रीय अध्यक्षच आपल्या पक्षाला नसल्यामुळे हे असले निर्णय कोण घेत आहे, याची कल्पना आपल्याला नसल्याचे सांगत कपिल सिब्बल यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. लवकरात लवकर वर्किंग कमिटीची बैठक कॉँग्रेसने बोलवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले की, त्या काँग्रेस नेत्यांच्या वतीने मी बोलत आहे, ज्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वर्किंग कमिटी आणि सेंट्रल इलेक्शन कमिटीला पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी पत्र लिहिले होते. त्या पत्राच्या उत्तराची आम्ही अजूनही वाट पाहत आहे. कपिल सिब्बल पुढे म्हणाले की, निर्णयाची वाट पाहण्याची पण एक मर्यादा असते. कांग्रेस संघटना आम्हाला पुन्हा एकदा बळकट करायचे आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत देशातील आणि पंजाबच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. आपण कोणाविरोधात नसून केवळ पक्षासोबत आहोत. पण वस्तुस्थिती ही आहे की आपल्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नाही.

कपिल सिब्बल पुढे म्हणाले की, ज्या पक्षाचे आपण सदस्य आहोत, त्या पक्षाला एक गौरवशाली इतिहास आहे. अनेक आव्हानांचा सामना सध्या पक्ष करत आहे. जी अवस्था आज पक्षाची आहे, ती असायला नको होती. आपल्याला सोडून अनेकजण जात आहेत. सुष्मिता गेल्या, सिंधिया गेले, जितिन प्रसाद आणि सुधीरन गेले. मग प्रश्न हा आहे की हे लोक का सोडून जात आहेत. यावर तार्किक उत्तर हवे. काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये याची चर्चा होणे गरजेचे आहे.