केईएम रुग्णालयातील २२ विद्यार्थ्यांना दोन्ही डोस घेऊनही कोरोनाची लागण


मुंबई – मुंबईतील केईएम रुग्णालय आणि सेठ जी.एस वैद्यकीय महाविद्यालयातील २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. चिंतेची बाब अशी आहे की, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस या विद्यार्थ्यांनी घेतले होते. कोरोनाचा प्रसार क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याविषयी भाष्य केले आहे.

पेडणेकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पेडणेकर म्हणाल्या, वेगवेगळी महाविद्यालये आणि केईएम रुग्णालयाचे २२ असे मिळून एकूण २९ कोरोनाबाधित आहेत. मला आत्ताच कळाले की, या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा सुरू होत्या. सातत्याने आपले मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री सांगत आहेत की, लसीचे दोन्ही डोस घेतले असले, तरी मास्क काढू नका, हेच संरक्षण आहे. काही विद्यार्थ्यांना थोडा त्रास जाणवत आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

त्या पुढे म्हणाल्या, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा भरवल्यामुळे निष्काळजीपणा झाला असू शकतो. त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे काहीही झाले तरी मास्क असायलाच हवा. आजही कोरोना संपलेला नाही. काळजी न करता काळजी घेतली पाहिजे. ही घटना काळजी करण्यासारखी नाही. सौम्य लक्षणे असलेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून इतरांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत.