रोनाल्डोला ब्रिटनमधील पेट्रोल टंचाईची झळ

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर आणि युनायटेड मँचेस्टरचा सुपरस्टार क्रिस्तियानो रोनाल्डो यालाही ब्रिटन मध्ये निर्माण झालेल्या पेट्रोल टंचाईची झळ बसली आहे. सुपरस्टार रोनाल्डोची सुपरकार बेन्टलेची टाकी फुल करून घेण्यासाठी रोनाल्डोचा ड्रायव्हर मँचेस्टर मधील एका पेट्रोल पंपावर आला पण सात तास प्रतीक्षा करूनही त्याला एक थेंब सुद्धा पेट्रोल मिळू शकले नाही. अखेर रागाने आणि वैतागाने तो कार परत घेऊन गेला. यावेळी रोनाल्डो कार मध्ये नव्हता पण त्याच्या बेन्टले जवळ रोनाल्डोच्या सुरक्षा टीमची कार पाहायला मिळाली.

रोनाल्डोच्या संग्रही अनेक महागड्या कार्स असून त्याने काही दिवसापूर्वीच २,२०,००० पौंड म्हणजे दोन कोटी पेक्षा अधिक किमतीची बेंटले कार खरेदी केली आहे. गेल्या आठवड्यात ही कार मँचेस्टर युनायटेडच्या ट्रेनिंग ग्राउंडवर चालविताना रोनाल्डो दिसला होता.

द सनच्या रिपोर्ट नुसार रोनाल्डोचा चालक सकाळी कारची टाकी फुल करण्यासाठी पेट्रोल पंपावर आला त्यावेळी पाउस येत होता. पेट्रोलचा टँकर येण्याची त्याने सात तास वाट पहिली पण पेट्रोल आलेच नाही. अर्थात पेट्रोल टँकर आला असता तरी रोनाल्डोच्या चालकाला टाकी फुल करता आली नसतीच. गेल्या आठवड्यापासून निर्माण झालेल्या पेट्रोल टंचाईमुळे प्रत्येक पंपावर प्रत्येक वाहनाला फक्त १५ लिटर पेट्रोल मिळेल असा नियम लागू केला गेला आहे. टंचाई मुळे ब्रिटन मधील ९० टक्के पेट्रोल पंप कोरडेच आहेत असेही समजते.