करोना नियमावली धाब्यावर, दिल्लीकरांनी भरला १७९ कोटीचा दंड

राजधानी दिल्ली मध्ये सध्या करोना साथीवर बऱ्यापैकी नियंत्रण आले असले तरी करोना नियमावली न पाळण्याकडे लोकांचा कल अधिक असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यात दिल्लीकरांनी करोना नियम न पाळून १७९ कोटींचा दंड भरला आहे आणि विशेष म्हणजे त्यातील सर्वाधिक दंड मास्क न लावण्याबद्दल भरला गेला आहे.

दिल्ली आपदा प्रबंधन अॅथॉरिटी म्हणजे डीडीएमएने सरकारी संस्था आणि पोलिसांना कोविड प्रोटोकॉल नियम सक्त लागू करण्याचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या नुसार एप्रिल ते सप्टेंबर या काळात १७९ कोटी रुपयांची दंड वसुली, २०४४५ जणांना अटक केली गेली आहे तर ६३०६१ केसेस पोलिसांनी दाखल केल्या आहेत. त्यात मास्क न घालणे, सुरक्षित अंतर न ठेवणे यासाठी चलने फाडली गेली आहेत.

ऑक्टोबर नोव्हेंबर हे आगामी महिने सणउत्सवाचे आहेत. या काळात करोनाचा उद्रेक पुन्हा होऊ शकतो हे लक्षात घेऊन करोना नियमावली काटेखोर लागू केली गेली आहे. सर्व जिल्हा अधिकारी, डीसीपी, नगर अधिकारी व अन्य संस्थांना फळभाजी बाजार, रेल्वे स्टेशन, बाजार,मॉल, दुकाने, आठवडी बाजार आणि सार्वजनिक जागांवर विशेष लक्ष देण्यास सांगितले गेले आहे. गेल्या ६ महिन्यात ऑगस्ट मध्ये सर्वाधिक म्हणजे ३२.३३ कोटी रुपये दंड वसूल केला गेला आहे असेही समजते.