जगातल्या या महागड्या साबणाची किंमत आहे २ लाखापेक्षा अधिक
महाग किंवा केवळ श्रीमंतानाच परवडतील अश्या वस्तूंबद्दल सर्वसामान्य लोकांना नेहमीच औत्सुक्य असते. म्हणूनच सेलेब्रिटी वापरत असलेले कपडे, दागिने, घड्याळे, कार्सच नव्हे तर त्याचे बूट, पर्सेस, कॉस्मेटिक्स या संदर्भातल्या बातम्या चवीने वाचल्या जातात असे दिसून येते. या मालिकेत जगात सर्वात महाग साबण कुठला याचा शोध घेतला असता लेबनान च्या त्रिपोली मध्ये बनणारा, दिसायला सर्वसामान्य वाटणारा ‘ द अल खान साबुन’ सर्वात महाग साबण आहे असे समजले. या साबणाची किंमत २८०० डॉलर्स म्हणजे २ लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
शेकडो वर्षांपासून हा साबण एकच परिवारात बनविला जातो आहे. बशर हसन अँड सन्स या नावाची ही कंपनी ‘ द खम अल साबुन’ या ब्रांडनेमने हा साबण बनविते. येथे लग्झरी सोप आणि स्कीन केअर प्रोडक्ट बनविले जातात. हा साबण बनविताना १७ ग्राम सोन्याचे आणि हिऱ्याचे चूर्ण, शुद्ध मध, ऑलीव्ह ऑईल, खजूर वापरला जातो. दिसायला हा अगदी सामान्य दिसला तरी साबण वापरल्यावर त्वचेवर तसेच मानसिक आणि अध्यात्मिक प्रभाव पडतो असे म्हणतात. अन्य साबण अगदी गुळगुळीत असतात मात्र हा साबण थोडा खरखरीत असतो.
या साबणाचे बहुतेक ग्राहक युएई आणि त्यातही दुबई मध्ये जास्त प्रमाणात आहेत. काही दुकानात या साबणाचा विशेष पुरवठा केला जातो. अमेरिकेत सुद्धा आता हा साबण उपलब्ध आहे. सर्वप्रथम २०१३ मध्ये कतार देशाच्या फर्स्ट लेडीला हा साबण गिफ्ट केला गेला होता. कंपनीचे सीईओ अमीर हसन यांनी अभिनेत्री व इन्स्टाग्राम सुपरस्टार शैल सब्त हिला साबणावर तिचे नाव कोरून गिफ्ट केला होता. २०१५ मध्ये प्रथम बीबीसीने या साबणाची प्रसिद्धी केली होती.