गुलाब चक्रीवादळामुळे आलेल्या पुरात आत्तापर्यंत ४३६ जणांचे बळी


मुंबई – राज्यातील विदर्भ-मराठवाडा भागाला गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झालेल्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर जनजीवनही विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याच नुकसानीचा आढावा घेतला आहे. राज्यात झालेल्या नुकसानीची आणि पंचनाम्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

वडेट्टीवार यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, ४३६ मृतांपैकी ६ जणांचे मृतदेह अद्याप हाती आलेले नाहीत. १३६ जण जखमी झालेले आहेत. उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद आणि जळगाव येथे आपत्ती निवारण दल मदतकार्य करत होते. उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टरद्वारे १६ तर बोटीद्वारे २० जणांना वाचवण्यात आले आहे. लातूरमध्ये हेलिकॉप्टरने ३ तर बोटीद्वारे ४७ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. औरंगाबादमध्ये २४ लोकांना बोटीद्वारे वाचवण्यात आले. या महिन्यात ७१ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर २६ जण जखमी झाल्याची नोंद आहे.

लहान मोठे सर्व प्रकारच्या ५७ जनावरांचा मृत्यू वीज पडून झाला आहे. तर १९६ मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. १७ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून आत्तापर्यंत ८१ टक्के पंचनामे झाले आहेत. पावसामुळे १९ टक्के पंचनामे बाकी आहेत. अजूनही काही माहिती प्राप्त होत आहे. हे नुकसान गुलाब चक्रीवादळापूर्वीचे आहे. २२ लाख हेक्टर शेती उध्वस्त झाल्याचा माझा अंदाज आहे.

पुढे ते म्हणाले, अतिवृष्टी ३८१ महसूल युनिटमध्ये झाल्याची नोंद आहे. तर १२७ ठिकाणी चार वेळा अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी आठ वेळा अतिवृष्टी झाली आहे. रस्त्याचे मोठे नुकसान झाले असून वीजपंप वाहून गेले आहेत. जमिनी खरडल्यात आहेत, खरडलेल्या जमिनींचेही पंचनामे होणार आहेत. अनेक जलस्त्रोतांचे प्रवाह बदलले आहेत.

रस्ते, पूल वाहून गेले असून सिंचन विभागाचेही मोठे नुकसान झाले आहे. आम्ही बऱ्याच वेळा केंद्राकडून मदतीची मागणी केली आहे. २०२० मध्ये गारपीट झाली होती, तेव्हाही केंद्राकडे मदतीची विनंती केली होती, पण केंद्राकडून पथक आले नाही. निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीसाठी १ हजार ६५ रुपयांची मागणी केंद्राकडे केली होती, त्यापैकी २६८ कोटी ५९ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.