पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ५३ लाख कुटुंबांचे वीज बिल माफ


अमृतसर – पंजाबमधील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेनुसार पंजाबमधील २ किलोवॅटपर्यंत वीज वापर असणाऱ्या कुटुंबांचे वीजबिल आता माफ केले जाणार आहे. पंजाब सरकार हे वीज बिल भरणार आहे. जवळपास ५३ लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सरकारला यासाठी जवळपास १२०० कोटी रुपयांचे वीज बिल भरावे लागेल. याशिवाय वीज बिल न भरल्यामुळे तोडण्यात आलेले कनेक्शन पुन्हा जोडण्यात येणार आहेत.

चरणजीत सिंग चन्नी म्हणाले, पंजाबमधील गावांमध्ये मी नेहमीच जात असतो. या भागात वीजेचा प्रश्न मुख्य आहे. आपले वीज बिल ५३ लाख कुटुंबांना भरता आलेले नाही. अधिकचे बिल न भरल्यामुळे अनेक घरांमधील वीज मीटरची जोडणी तोडण्यात आली आहे. मी त्यांची अडचण समजू शकतो आणि ती सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्यामुळे पंजाब सरकार या ५३ लाख कुटुंबांचे वीज बिल भरेल. यातील ७५ ते ८० टक्के वीज ग्राहक २ किलोवॅट वर्गातील आहेत. वीज जोडणी तोडलेल्या ठिकाणी पुन्हा वीज जोडणी दिली जाईल. तसेच त्यांच्या शेवटच्या वीज बिलाची काळजी आम्ही घेऊ.

यावेळी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यावरही चरणजीत सिंग चन्नी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, पक्षाचा जो कुणी अध्यक्ष असतो, तो कुटुंबाचा प्रमुख असतो. नवज्योत सिंग सिद्धू यांची मी भेट घेतली आणि पक्ष सर्वोच्च असल्याचे सांगितले. त्यांना फोन करुन मी भेटून चर्चा करण्याविषयी आणि हा विषय सोडवण्याबाबत चर्चा केली.