जापानच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार फुमिओ किशिदा !


टोकियो – जापानच्या पंतप्रधानपदी माजी परराष्ट्रमंत्री फुमिओ किशिदा यांची वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेतेपदी किशिदा यांची निवड झाल्यामुळे निवडणूक जिंकल्यास किशिदा जापानचे पुढचे पंतप्रधान होतील, हे स्पष्ट आहे. लिबरल डेमोक्रेटिक पक्षाचे मुख्य नेते योशिहदे सुगा यांची जागा त्यांनी घेतली आहे. एका वर्षानंतर सुगा आपले पद सोडणार आहेत. सुगा यांची एक वर्षापूर्वी पंतप्रधानपदी वर्णी लागली होती. तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची वर्णी लागली होती.

किशिदा यांच्या रुपाने लिबरल डेमोक्रेटिक पक्षाला नवे नेतृत्व मिळाले आहे. पंतप्रधानपदासाठी किशिदा यांना मुख्य दावेदार मानले जात होते. पक्षासाठी ६४ वर्षीय किशिदा यांनी योजना प्रमुख ही जबाबदारी पार पाडली आहे. यापूर्वी २०२० मध्ये पक्ष नेतृत्वाच्या शर्यतीत योशीहिदे सुगा यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. पण त्यांना आता यश मिळाले आहे. वॅक्सिनेशन मंत्री तारो कोनो यांना किशिदा यांनी मात दिली आहे. या निवडणुकीत दोन महिला उमेदवारीही होत्या. साने ताकिची आणि सीइको नोडा अशी त्यांची नावे असून पहिल्या फेरीतच दोघे बाद झाले. पक्ष नेतृत्वाची निवडणूक जिंकल्यानंतर आता पुढील महिन्यात ते देशाचे पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारतील.

क्रेडिट बँक ऑफ जापानमध्ये किशिदा यांनी काम केले आहे. त्यानंतर प्रतिनिधी सभेच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यांची वर्ष १९९३ मध्ये निवडणूक प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती. त्यानंतर हिरोशिमामधून खासदार म्हणून निवडून आले. २००७ ते २००८ आबे यांच्या मंत्रिमंडळात होते. त्यानंतर फाकुदा यांच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली. २००८ मध्ये फाकुदा यांनी त्यांना खाद्य सुरक्षा राज्यमंत्रिपद दिले होते.

दुसरीकडे, ६३ वर्षीय फुमिओ यांनी ट्वीटरवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे चांगलाच वाद झाला होता. त्यांनी एप्रिल महिन्यात आपल्या पत्नीचा फोटो शेअर केला होता. त्यात एप्रॉन घालून पत्नी किशिदा यांना जेवण वाढत होती. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर या फोटोमुळे टीकेची झोड उठवली होती. पत्नीला नोकरासारखी वागणूक दिल्याची टीका नेटकऱ्यांनी केली होती.