मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पूरस्थितीचा अजित पवारांनी घेतला आढावा


मुंबई :- बंगाल उपसागरातल्या गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी, पुरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.

उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्त मराठवाड्यात पाठवण्यात आले असल्याचेही त्यांना सांगितले.

अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यानं रेड अलर्ट असलेल्या पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव या जिल्ह्यांच्या तसंच ऑरेंज अलर्ट असलेल्या मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांच्या प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

राज्य व जिल्ह्यांच्या आपत्कालिन मदत यंत्रणांनी सतर्क आणि परस्परांच्या संपर्कात राहून आपत्तीग्रस्तांसाठी बचाव व मदतकार्य तात्काळ सुरु करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हा आपत्कालिन मदत यंत्रणांना दिल्या आहेत.