लखनौ मध्ये तयार झाले हेल्थ एटीएम

उत्तर प्रदेशात नागरिकांना आरोग्य सुविधा अधिक सुलभतेने आणि त्वरित मिळाव्यात यासाठी योगी सरकारने शहरी तसेच ग्रामीण भागात ‘हेल्थ एटीएम’ बसविण्याची तयारी पूर्ण केली असून राजधानी लखनौच्या लालबाग स्मार्टसिटी कमांड कंट्रोल जवळ असे पहिले एटीएम बसविले गेले आहे. त्याचे लोकार्पण लवकरच केले जाणार असल्याचे समजते. शहरात अन्य ठिकाणीही अशी १०० एटीएम बसविण्याचे काम जोरात सुरु आहे.

या एटीएम मध्ये १० मिनिटात नागरिकाना डेंग्यू, मलेरिया, एचआयव्ही, टायफॉईड अश्या ५९ पेक्षा अधिक चाचण्या करून घेण्याची सुविधा आहे. ही सर्व सुविधा मोफत असून रुग्णांना पैसे भरून या चाचण्या करून घेण्यासाठी विविध हॉस्पिटल मध्ये जाण्याची गरज त्यामुळे राहणार नाही.

यात अत्याधुनिक मशीन्सच्या सहाय्याने बॉडी मास इंडेक्स, रक्तदाब, मेटाबोलीझम रेट, बॉडी फॅट, हायड्रेशन, पल्स रेट, ऑक्सिजन पातळी, उंची, मसल मास, बॉडी स्कॅनिंग सह १६ प्रकारच्या चाचण्या त्वरित करून घेता येतील तर रॅपिड टेस्ट, युरीन, प्रेग्नन्सी, ग्लुकोज, हिमोग्लोबिन, लीपिड या चाचण्याही करून घेता येतील.

सर्वसामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश योगी सरकारने पूर्वीच दिले असून त्यानुसार हेल्थ एटीएम बसविली जात आहेत. पूर्वी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शहरी आरोग्य केंद्रात अशी एटीएम बसविण्याचा विचार होता आपण नंतर एटीएम मशीन प्रमाणे सर्व मोक्याच्या ठिकाणी ती बसवावीत असे आदेश योगी सरकारने दिले होते असे समजते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही