रशियात वाढतेय निळ्या कुत्र्यांची संख्या

रशियाची राजधानी मॉस्को पासून ३७० किमी वर झररीन्स्क शहरातील गल्ल्यांत, रस्त्यावर निळ्या रंगांच्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. यामागे कारखान्यातून आणि हवेतून वाढत चाललेले प्रदूषण कारणीभूत असल्याचे प्राणी संरक्षक संस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे चार वर्षापूर्वी २०१७ मध्ये मुंबईत सुद्धा अशी ११ कुत्री आढळली होती तेव्हा प्रदूषण नियंत्रण बोर्डाने काही केमिकल कारखान्यांना उत्पादन बंद करणे भाग पाडले होते. या कारखान्यातून नदीत सोडल्या जाणाऱ्या डाय आणि काही रसायनाच्या मुळे कुत्रांच्या फरचा रंग निळा होतो असे लक्षात आले होते.

रशियात घडत असलेला प्रकार असाच असून प्राणी संरक्षक संस्थांच्या मते या भागातील रासायनिक कारखान्यातून निर्माण होणाऱ्या प्लेक्सीग्लास, हायड्रोसायनिक अॅसिडचा हा परिणाम आहे. हे घटक पाण्यात मिसळले तर फार विषारी रसायन तयार होते. कॉपर सल्फेट या द्रव्यामुळे फरचा रंग निळा होतो. त्याचा आरोग्यावर थेट परिणाम दिसत नसला तरी त्वचेला खाज येणे, आग होणे, त्वचेतून रक्त येणे असे प्रकार होतात आणि त्यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर गंभीर आजार होऊ शकतात.