चीनमध्ये अभूतपूर्व वीज टंचाई, जागतिक बाजारावर होणार परिणाम

चीन मध्ये सध्या अभूतपूर्व वीज टंचाई झाली असून त्याचे परिणाम जागतिक बाजारावर होतील असे संकेत मिळू लागले आहेत. चीनला या वीज संकटातून बाहेर येण्यास वर्षभराचा अवधी लागू शकतो असेही सांगितले जात आहे. चीनच्या पूर्वोत्तर भागात अनेक बड्या शहरात वीज टंचाई मुळे कारखान्यातील उत्पादन थंडावले आहेच पण घरात पाणी गरम करणे, पॉवर आधारित उपकरणे वापरास बंदी केली गेली आहे. या भागातील मॉल, दुकाने बंद असून नागरिकांना अंधारात जगण्याची वेळ आली आहे.

हे संकट ओढविण्यामागे उत्पादकांकडून विजेच्या मागणीत झालेली वाढ आणि त्या प्रमाणात वीज उत्पादनासाठी कोळसा न मिळणे हे कारण सांगितले जात आहे. चीन मधील काही बंदरे दीर्घकाळ बंद आहेत. त्यामुळे मागणीनुसार कोळशाच्या पुरवठा होऊ शकलेला नाही. जी थोडी बंदरे सुरु आहेत तेथे कोळसा मागणीसाठी दीर्घ प्रतीक्षा यादी आहे. चान्गचुंग, झेझीयांग भागात वीज कनेक्शन तोडण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे मॉल, दुकाने बंद आहेत.

जगभरात इलेक्ट्रोनिक्स गॅजेटसाठी वापरले जाणारे सुटे भाग बहुतांशी चीन मधून पुरविले जातात. पण वीज संकटामुळे हे कारखाने बंद करावे लागले आहेत. अॅपल, टेस्लाने सुद्धा त्यांच्या कारखान्यात काम बंद ठेवले आहे. याचा परिणाम जागतिक बाजारावर होणार आहे. नवीन वर्ष, नाताळ, सणउत्सव काळात मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी वाढत असते पण सुटे भाग पुरविणारे चीनी कारखाने बंद असल्याने सुट्या भागांचा पुरवठा होऊ शकलेला नाही. त्याचा थेट परिणाम आशिया आणि पश्चिमी देशात जाणवणार आहे. जागतिक बाजारात कपडे,खेळणी आणि काही मशीन्सचे सुटे भाग हे क्षेत्र प्रभावित होण्याचा धोका आहे.

चीनच्या पूर्वोत्तर भागात प्रचंड थंडी पडते त्यामुळे गिझर, घरे उबदार ठेवणारे हिटर आवश्यक ठरतात. पण वीज नसल्याने त्यांच्या वापरावर बंदी आली आहे. या वीज टंचाईचा प्रभाव पुढच्या वर्षीपर्यंत राहील असे संकेत मिळत आहेत.