हार्ले डेव्हिडसनची ऐतिहासिक स्कुटर लिलावात मिळणार
अमेरिकन ऑटो कंपनी हार्ले डेव्हिडसनचे नुसते नाव घेतले की एकापेक्षा एक मजबूत आणि दणकट बाईक्स नजरेसमोर येतात. याच नामवंत कंपनीने १९५० च्या दशकात होंडा बरोबर स्पर्धा करण्यासाठी एक स्कुटर ‘टॉपर स्कुटर’ नावाने बाजारात आणली होती याची माहिती फारशी कुणाला नसेल. पाच वर्षे या स्कूटर्सचे उत्पादन केले गेले होते. गेल्या युगातील म्हणावी अशी ही स्कुटर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मेकमच्या लास वेगास २०२२ च्या लिलावात ही स्कुटर विक्रीसाठी ठेवली जाणार आहे.
या स्कुटरची तीन मॉडेल त्यावेळी हार्ले डेव्हिडसनने बाजारात आणली होती. त्यातील कुठले मॉडेल लिलावात ठेवले जाणार आहे याचा खुलासा केला गेलेला नाही. या स्कुटरला सिंगल सिलेंडर, फ्लॅट माउंटेड दोन स्ट्रोक इंजिन दिले गेले होते. २० इंची चाके आणि क्रोम इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर मध्ये पूल स्टार्ट कॉर्ड दिली गेली होती. आज ज्या प्रकारच्या स्कुटर बाजारात आहेत त्या तुलनेत ही स्कुटर अगदीच फिकी वाटली तरी त्याकाळी ती अनोखीच होती. अतिशय चांगला बॅलन्स ही तिची खासियत होती. आज फक्त वाहन म्हणून नाही तर दुचाकी चाहत्यांच्या साठी ती ‘पीस ऑफ आर्ट’ आहे.
हा लिलाव २५ ते २९ जानेवारी या काळात होणार आहे.