मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गुलाब चक्रीवादळाचे धुमशान, 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट


मुंबई : मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गुलाब चक्रीवादळामुळे पावसाचे धुमशान पाहायला मिळत आहे. कालपासून मराठवाड्यात तुफान पाऊस बरसत आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कमी दाबाचे क्षेत्र गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झाले आहे. पुढील 48 तास त्याचा प्रभाव राज्यावर पाहायला मिळणार आहे. इकडे मुंबईसह ठाणे आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे.

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, विदर्भात पावसाचा प्रभाव कमी जाणवेल. तर उद्या उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात प्रभाव राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 3 ते 4 तासात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा आहे. धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे.

दरम्यान आज पालघर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि जालना या 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.