गरजू व्यक्तींना मदत केल्याबद्दल राज्यपालांकडून सिंधी समाजाचा गौरव


मुंबई :- सिंधी समाजातील अनेक लोक स्वातंत्र्यानंतर स्थलांतर करून भारतात आले. सुरुवातीला आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थिती असून देखील समाजातील लोकांनी बुद्धीमत्ता व परिश्रमांच्या बळावर प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवली. संत झुलेलाल यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून करोना काळात सिंधी समाजाने सर्व समाजातील गरजू व्यक्तींना केलेली मदत कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.

सिंधी हेरीटेज फाउंडेशनच्‍या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू व्यक्तींना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत’ कीट देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार संजय केळकर, आमदार गणपत गायकवाड, सिंधी हेरीटेज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नारायण बबलानी, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मुकेश बजाज, महिला अध्यक्षा दिव्या बजाज आदी उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध क्षेत्रातील करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

करोना संकटाप्रमाणे अतिवृष्टी, भूस्खलन, चक्रीवादळ यांसारखी संकटे अधून मधून येत असतात. अश्यावेळी केवळ सरकारकडून मदतीची अपेक्षा न करता समाजातील दानशूर लोकांनी परोपकाराचे काम केले पाहिजे असे सांगून सर्व समाजाने एकत्रितपणे काम केल्यास करोनासारख्या कोणत्याही संकटाचा समर्थपणे सामना करता येईल असे राज्यपालांनी सांगितले.

करोनामुळे बिघडलेली अर्थव्यवस्था सावरत असून देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने अग्रेसर होत आहे असे सांगून ७२० बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार कीट देण्याच्या सिंधी हेरीटेज फाउंडेशनच्या निर्णयाचे राज्यपालांनी कौतुक केले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते आमदार संजय केळकर, आमदार कुमार आयलानी, आमदार, गणपत गायकवाड, डॉ. गुरुमुख जगवाणी, थंडाराम तोलानी, रमेश बजाज, दयाल हरजानी, अनिला सुंदर, काजल चंदिरामाणी, अजित मन्याल, डॉ. मनीष मिराणी, मुरली अदनानी, राजू खेतवानी, दिनेश तहलियानी, जीतू जगवानी, प्रेम भारतीय व उल्हासनगरच्या सिंधी हेरीटेज फाउंडेशनच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.