देगलूर – निवडणूक आयोगाने नुकतीच देशभरातील एकूण ३३ मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या देखील पोटनिवडणुकीचा देखील समावेश आहे. या निवडणुकीसाठी पुढील महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असेल. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी मतदान जाहीर झाल्यामुळे आता राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे.
नांदेड : ३० ऑक्टोबरला होणार देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीप्रमाणे, ८ ऑक्टोबरपर्यंत या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. अर्जांची छाननी ११ ऑक्टोबरपर्यंत केली जाणार असून १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. यानंतर १७ दिवसांनी म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी मतदान होईल, तर २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.
२००९च्या निवडणुकांमध्ये नांदेडच्या देगलूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. पण २०१४ च्या निवडणुकीत येथील मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपले मत टाकले. तिथे सुभाष साबणे आमदार म्हणून निवडून आले. २०१९मध्ये काँग्रेसने हा मतदारसंघ पुन्हा जिंकत रावसाहेब अंतापूरकर आमदार झाले. पण, त्यांच्या निधनानंतर तिथे पुन्हा निवडणुका लागल्या आहेत.
नांदेड हा कॅबिनेट मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे. मात्र, शिवसेनेने येथे २०१४मध्ये काँग्रेस उमेदवाराला पराभूत करत अशोक चव्हाणांना मात देणे शक्य असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळेच यंदा देखील काँग्रेसेतर पक्षांकडून या मतदारसंघासाठी जोरदार प्रयत्न केले जातील अशी चिन्ह आहेत. त्यात ही निवडणूक भाजपने देखील प्रतिष्ठेची करत काँग्रेस आणि पर्यायाने महाविकासआघाडी सरकारला मात देण्याची संधी म्हणून जोर लावला आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.