कोबी, ब्रोकोली तोडणार, त्याला ६३ लाख पगार मिळणार

कोणतेही काम चांगला पैसा देणारे असेल तर अश्या कामांसाठी कर्मचारी भरपूर प्रमाणात मिळणार असे म्हटले तर चुकीचे नाही. अनेकजण पगाराची रक्कम अधिक असेल तर कामाचे स्वरूप न पाहता सुद्धा त्या जागेसाठी अर्ज करतात. असाच एक आकर्षक जॉब सध्या चर्चेत आला असून यात भाजी तोडणी करण्यासाठी वर्षाला ६२४०० पौंड म्हणजे ६३,११,६४१ रुपये पगार दिला जाणार आहे.

युके मधील फार्मिंग कंपनी टी एच क्लेमेंट अँड सन्स यांनी या संदर्भात ऑनलाईन जाहिराती दिल्या आहेत. यात पूर्ण वर्षभर कोबी आणि ब्रोकोली तोड करण्यासाठी वरील पगार दिला जाणार आहे. शिवाय अन्य फायदे आहेत. तासावर काम करणाऱ्यांना ताशी ३० पौंड म्हणजे ३ हजार रुपये मिळतील. शिवाय हे पैसे प्रती नग मिळविण्याचा पर्याय आहेच. म्हणजे तुम्ही जितके जास्त कोबी आणि ब्रोकोली तोडाल तेवढे पैसे मिळविता येणार आहेत.

कंपनीने दिलेल्या जाहिरातीत फिल्ड ऑपरेटर हवेत असे म्हटले आहे आणि हे शारीरिक कष्टाचे काम आहे याचा उल्लेख केला आहे. यात एका दिवसात जास्त पैसे कमावण्याची संधी आहेच. शेतीकामासाठी इतका प्रचंड पगार प्रथमच दिला जात आहे. पण त्यामागे कारण आहे. सध्या युके मध्ये वर्कर्सची प्रचंड टंचाई जाणवते आहे. त्यामुळे सरकारने हंगामी स्वरुपात कृषी मजुरांना ६ महिने तेथे येता येईल अशी योजना जाहीर केली आहे.

अन्यवेळी कमी प्रतीच्या मानल्या जाणाऱ्या अनेक सेक्टर्स मध्ये सध्या भरभक्कम पगार देण्याची तयारी दाखविली जात असून त्यात ट्रकड्रायव्हर, पेट्रोल पंपावर काम करणारे अश्या कामगारांचा समावेश आहे.