२१ कोटीच्या सुलतानचा हार्टअॅटॅक मुळे मृत्यू
भारतात हरियाना राज्याची शान बनलेला प्रसिद्ध रेडा, सुलतान याचा नुकताच हार्टअॅटॅक मुळे मृत्यू झाल्याचे त्याचे मालक नरेश बेनिवाल यांनी जाहीर केले आहे. देशभरातील अनेक पशु मेळ्यात आपल्या प्रदेशाचे नाव गाजविणारा सुलतान आता यापुढे दिसणार नाही याची हळहळ व्यक्त केली जात आहे. पुष्कर येथे भरलेल्या पशु मेळ्यात सुलतान साठी एका परदेशी ग्राहकाने २१ कोटी रुपयांची बोली लावली होती मात्र बेनिवाल यांनी त्याला विकायला नकार दिला होता.
नरेश बेनिवाल सांगतात, मुर्रा जातीचा सुलतान जगातील सर्वाधिक लांबीचा आणि उंचीचा रेडा होता. त्याचे वजन १७०० किलो आणि वय १२ वर्षे होते. भारतात अनेक स्पर्धा मध्ये तो विजेता होता. त्याच्या जाण्याचे परिवाराला मोठे दुःख आहे. एकदा तो बसला की ७-८ तास बसत असे.
त्याची खासियत म्हणजे रोज त्याला १० किलो धान्य, तेवढेच दुध, ३५ किलो हिरवा चारा, सफरचंद, गाजरे असा आहार दिला जात असे. रोज त्याला ३ हजार रुपयाचा चारा लागत असे पण बक्षिसे आणि सिमेन म्हणजे विर्यातून तो लाखोंची कमाई करत असे. यामुळेच सुलतान लोकप्रिय होता. म्हैस पालन करणारे अनेक व्यावसायिक सुलतानचे वीर्य त्यांच्या म्हशी गाभण करण्यासाठी नेत असत. त्याची किंमत एका डोस साठी ३०० रुपये होती. असे लाखो रुपये या विक्रीतून मालकाला मिळत असत.
सुलतान एका म्युझिक अल्बम मध्ये झळकला होता. त्याची कमतरता भरून येणार नाही असे बेनिवाल सांगतात.