युएई एक्स्पो २०२० मध्ये सादर होणार सोन्याच्या अक्षरातील सर्वात मोठे कुरान
आंतरराष्ट्रीय पाकिस्तानी कलाकार शाहीद रसम यांनी युएई येथे भरणाऱ्या एक्स्पो २०२० मध्ये ‘सुरह सलमान’ मध्ये जगातील सर्वात मोठ्या आकाराचे कुरान पेश करणार असल्याचे सांगितले आहे. पाक असोसिएशने दुबई येथील प्रेस कॉन्फरन्स मध्ये याची घोषणा केली आहे.
हे कुरान तयार करताना अल्युमिनियम आणि सोन्याचा लेप दिलेल्या अक्षरात ते कोरले जाईल. प्रथमच या प्रकारचे कुरान लिहिले जात असल्याचे सांगून शाहीद म्हणाले, माझ्या कौशल्य कल्पनेतील एक मास्टरपीस म्हणून ते पेश केले जाणार आहे. ५५० पाने असलेल्या या ग्रंथात ८० हजार शब्द विकसित केले जात असून त्यासाठी २०० किलो सोने आणि २ हजार किलो अल्युमिनियमचा वापर होणार आहे. प्रत्येक पानावर १५० शब्द असतील.
युएई एक्स्पो २०२० मध्ये या कुराणाचा एक हिस्सा पेश केला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास २०२५ साल उजाडेल असे सांगितले जात आहे. १४०० पेक्षा अधिक इस्लामी इतिहासात प्रथमच पवित्र कुरान हाय क्वालिटीच्या कॅनव्हासवर अल्युमिनियम आणि सोन्याच्या अक्षरात अंकित होत आहे. फ्रेम वगळता या ग्रंथाचा आकार ६.५ फुट बाय ८.५ फुट आहे. शाहीद यांनी त्यांचे विद्यार्थी आणि प्रतिभाशाली कलाकार यांच्या एका गटाला खास प्रशिक्षण दिले असून सध्या या प्रकल्पावर २०० लोक काम करत आहेत.