देशातील मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वऱ्हाडातील ‘बँड बाजा पार्टी’सारखी – असदुद्दीन ओवेसी


कानपूर – मुस्लिमांचा वापर करणाऱ्या राजकीय पक्षांवर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला आहे. देशातील मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वऱ्हाडातील ‘बँड बाजा पार्टी’सारखी झाली असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी यांनी खंत व्यक्त करताना प्रत्येक जातीकडे त्यांचा नेता आहे. पण मुस्लिमांकडे नसल्याचेही म्हटले.

लग्नाच्या वरातीमधील बँड बाजा पार्टीसारखी मुस्लिमांची अवस्था झाली आहे, जिथे मुस्लिमांना आधी संगीत वाजवायला सांगितले जाते आणि लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बाहेर उभे केले जाते, असे ओवेसी यांनी यावेळी म्हटले. ते पुढे म्हणाले की, आता मुस्लीम वाद्य वाजवणार नाहीत. प्रत्येक जातीकडेही त्यांचा नेता आहे, पण मुस्लिमांकडे त्यांचा नेता नाही. उत्तर प्रदेशात १९ टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे, पण एकही नेता नाही.

यावेळी सीएएविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनांचा उल्लेख करताना ओवेसी यांनी सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन करताना मृत्यू झालेले शहीद असल्याचे म्हटले. त्या लोकांना ज्यांनी मारले ते सर्व नष्ट होवोत, असे यावेळी त्यांनी म्हटले. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ओवेसी यांनी अयोध्येतून प्रचार मोहिमेला सुरुवात केली असून अनेक सभा घेतल्या आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत ४०३ जागांपैकी १०० ठिकाणी आपले उमेदवार असतील अशी घोषणा ओवेसी यांनी केली आहे. राज्यातील ८२ असे मतदारसंघ आहेत, जिथे मुस्लीम मतदारांची संख्या जास्त असून उमेदवारांचे भवितव्य ठरवू शकतात.