देशात काल दिवसभरात 26 हजार 41 कोरोनाबाधितांची नोंद, तर 276 जणांचा मृत्यु


नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी, अद्याप धोका टळलेला नाही. देशात काल दिवसभरात कोरोनाच्या 26 हजार 41 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच, 276 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 29 हजार 624 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा सध्या तीन कोटी 29 लाख 31 हजार 972 वर पोहोचला आहे. अशातच सक्रिय रुग्णांची संख्या घटून 2 लाख 99 हजार 620 वर पोहोचली आहे. देशातील एकूण आकडेवारीनुसार, आतापर्यंत तीन कोटी 36 लाख 78 हजार 786 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 47 हजार 194 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 38 लाख 18 हजार 362 लसीचे डोस काल दिवसभरात देण्यात आले आहेत. त्यानंतर आता लसीकरणाचा एकूण आकडा 86 कोटी एक लाख 59 हजार 11 वर पोहोचला आहे.

दरम्यमान महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. काल दिवसभरात राज्यात 3,206 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 292 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 63 लाख 64 हजार 027 बाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.24 टक्के आहे. कोरोना नियंत्रणात येत असतानाच राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच राज्यात काल दिवसभरात 36 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. परिणामी आतापर्यंत 1 लाख 38 हजार 870 बाधितांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात कोरोनाचे 37 हजार 860 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.

काल दिवसभरात मुंबईत 479 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 481 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आतापर्यंत मुंबईत 7,18,002 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. सध्या मुंबईत 4667 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1208 दिवसांवर गेला आहे.

तर काल दिवसभरात पुण्यात 171 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 196 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत पुण्यात 48,9681 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या पुण्यात 1552 सक्रिय रुग्ण आहेत. तर 185 गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत.