आता देशातील कोणताही नागरिक आरोग्यसुविधांपासून वंचित राहणार नाही – नरेंद्र मोदी


नवी दिल्ली – पंतप्रधान डिजीटल आरोग्य योजनेचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधानांनी यावेळी देशातील जनतेला संबोधित केले. त्यांनी यावेळी बोलताना आरोग्यसेतू, कोविन सारख्या डिजीटल सुविधांच्या करोनाकाळातील कामगिरीचे कौतुक केले आहे. तर कोरोना काळात टेलिमेडिसीनच्याही वापरात वाढ झाली असून ई-संजीवनी सुविधेचा लाभही अनेकांना झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच देशातील डॉक्टर,नर्सेससह सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

ते यावेळी बोलताना म्हणाले, आता देशवासियांना आयुष्मान भारत डिजीटल मिशन अंतर्गत डिजीटल हेल्थ आयडी मिळेल. प्रत्येक नागरिकाचे हेल्थ रेकॉर्ड डिजीटली सुरक्षित राहील. यामुळे रुग्ण आणि डॉक्टर दोघेही रुग्णाच्या आरोग्यस्थितीबद्दलची माहिती घेऊ शकतील. डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची नोंदणीही या प्रणाली द्वारे केली जाणार आहे. तसेच दवाखाने, औषधाची दुकाने, लॅबोरेटरी, प्रत्येक गोष्ट या प्रणालीच्या माध्यमातून नोंदणीकृत होणार आहे आणि आरोग्यविषयक सर्व सुविधा एकाच छताखाली देशवासियांना मिळणार आहेत. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात रुग्णांना डॉक्टर शोधत बसण्याची गरज भासणार नाही. फक्त डॉक्टरच नव्हे तर मेडिकल आणि चाचण्यांसाठीच्या लॅब्सही या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.

ते पुढे म्हणाले, हे अभियान देशातील आरोग्य सेवांना सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. भारताने गेल्या काही वर्षांत देशातील आरोग्याबद्दलची दशकातील विचारसरणी आणि दृष्टिकोन बदलला आहे. आता भारतात सर्वसमावेशी आरोग्य मॉडेलची निर्मिती केली जात आहे. हे मॉडेल किफायती, उच्च दर्जाचे आणि सर्वांना उपलब्ध होईल, असे असेल.