शिवसेनेच्या माजी खासदाराला बँक घोटाळा प्रकरणी ईडीचे समन्स


मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना समन्स बजावले आहे. त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पण अडसूळ दिल्लीला जाणार असल्यामुळे हजर रहाणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सिटी को-ऑप बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांची याआधीही चौकशी करण्यात आली होती. नवनीत राणांच्या तारखेवेळी नेहमीच समन्स पाठवले जात असल्याचा आनंद अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी केला आहे. सर्व चौकशीला सामोरे जायला आम्ही तयार, पण नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाच्या केसचा निकालही निःपक्षपाती व्हायला हवा, अशी मागणीही अभिजीत अडसूळ यांनी केली.

एबीपी माझाशी आनंदराव अडसूळ यांनी बोलताना म्हटले की, माझ्यावर जे आरोप लावले आहेत, त्या ऑडिट प्रकरणात मी, माझा मुलगा यांचा काही संबंध नाही. ईडीचे अधिकारी सकाळी आले होते. त्यांनी मला समन्स दिले. मी त्यांना सांगितले की मी दिल्लीला जात आहे. मी याआधीच ईडी कार्यालयात जाऊन आलो आहे. रवि राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्या केसची सुनावणी आली की मला ईडीकडून समन्स पाठवण्यात येते. रवी राणा यांनी हे सर्व मॅनेज केले आहे. वर त्यांचे सरकार असल्याचा आरोपही आनंद अडसूळ यांनी केला. दरम्यान खातेदार, ठेवीदारांनी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंघाने बॅंकेतील काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. पण बँकेचा टर्नओव्हर 800 कोटींचा असताना 900 कोटींचा घोटाळा कसा होईल असेही अडसूळ म्हणाले.

तसेच आनंद अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाची तारीख असली की दरवेळी असे उपद्व्याप सुरू असतात. आम्हीच बँकेत गैरव्यवहाराबाबत अगोदर तक्रार केली आहे. लक्ष विचलित करण्यासाठी ईडी चौकशीचा हा फार्स आहे, असं अभिजित अडसूळ यांनी म्हटले आहे.

दरम्यान आमदार रवी राणा यांनी म्हटले की, मुंबई येथील सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत माजी खासदार अडसूळ यांनी 900 कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी ईडीकडे आपण स्वत: तक्रार केली होती. त्याअनुषंगाने ईडीने कारवाई केली आहे. ठेवीदार, खातेदारांच्या श्रमाची रक्कम बळकावण्याचा हा प्रकार असल्याचे राणा म्हणाले.