पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप खासदारावर हल्ला


कोलकाता – भवानीपूर पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या राजकारणात केंद्रस्थानी असून आज भवानीपूर पोटनिवडणुकीत प्रचाराचा शेवटचा दिवस होता. ही जागा जिंकण्यासाठी तृणमूल आणि भाजपने पूर्ण ताकद लावली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येथून निवडणूक लढवत आहेत. भाजपने प्रियांका तिब्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, तृणमूल समर्थकांनी दिलीप घोष यांच्यावर प्रचारादरम्यान हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भवानीपूरमध्ये दिलीप घोष यांची पदयात्रा सुरू होती, त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या दरम्यान भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

३० सप्टेंबर रोजी भवानीपूर विधानसभा जागेसाठी मतदान होणार आहे आणि आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आहेत, तर भाजपने वकील प्रियांका तिब्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी राहण्यासाठी या निवडणुकीत विजय आवश्यक आहे. कारण मे महिन्यात झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालांमध्ये त्यांना नंदीग्राम मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या एका सभेचे जडुबाजारमध्ये भाजपाचे खासदार आणि बंगाल भाजपचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांच्या नेतृत्वाखाली आयोजन केले होते.त्याचवेळी काही तृणमूल कार्यकत्यांनी येऊन बैठकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तृणमूल समर्थकांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये भाजप कार्यकर्ता जखमी झाले. त्यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ममता बॅनर्जींवर टीका करताना अर्जुन सिंह म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही निवडणुका जिंकण्यासाठी दहशतीचा वापर करावा लागतो.