आनंदराव अडसूळ यांना ईडीच्या समन्सनंतर किरीट सोमय्या म्हणतात


मुंबई – माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवि राणा यांच्यातील लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. अडसुळ यांना आमदार रवि राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीने समन्स पाठवले आहे. त्यानंतर ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहचले होते. दरम्यान प्रकृती खालावल्याने आनंदराव अडसूळ यांना स्ट्रेचवरुन बाहेर आणण्यात आले आणि नंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यानंतर आता माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सिटी को-ऑपरेटिव्ह बॅंक शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी बुडवली. ९४ कोटी छोट्या गुंतवणूकदारांचे रुपये गेले. अडसूळ यांच्या खात्यामध्ये कोट्यावधी रुपये जमा झाले आहेत. गुंतवणूकदारांसाठी उद्धव ठाकरेंनी काही कारवाई केली नाही. अनेक समन्स ईडीने पाठवल्यानंतरही अडसूळ जात नव्हते. त्यामुळे आज अडसूळ यांना अटक करण्यात आली आहे. छोट्या गुंतवणूकदारासांठी झालेल्या या कारवाईचे मी स्वागत करतो. मंत्री नेत्यांनी जनतेला लुटायचे आणि मग कारवाई झाली तर ती सुडापोटी झाल्याचे म्हणायचे. घोटाळेबाजांविरुद्ध कारवाई होणारच, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

सिटी को-ऑपरेटिव्ह बॅंकेला आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या जावयाने स्वतःच्या मालमत्ता भाड्याने दिल्या. त्या बॅंकेचे चेअरमन हे आनंदराव अडसूळ आहेत. बॅंकेतील खातेदारांचे पैसे अवैध पद्धतीने बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आल्यामुळे ही बॅंक बुडाली. यामध्ये ९८० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल होऊन दोन वर्ष झाली, मात्र मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे असल्यामुळे यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर मला आज माहिती मिळाली आहे की आनंदारव अडसूळ यांना अटक झाली आहे. हळूहळू तुमच्यावरही ही वेळ येणार आहे, असे आमदार रवि राणा यांनी म्हटले आहे.

इडीचे अधिकारी आनंदराव अडसूळ यांच्या घरी आले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरु असेल. ईडीचे अधिकारी एवढ्या सकाळी आल्यानंतर मला वाटले की त्यांना अटक झाली असेल. कारण गंभीर गुन्हा त्यांनी केला आहे. ईडीने कारवाई केली असेल तर खातेदारांना नक्की न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया रवि राणा यांनी दिली आहे.