दूरसंचार विभागाची नवी नियमावली, १८ वर्षाखाली सीम खरेदी नाही

दूरसंचार विभागाने भारतात सीम कार्ड खरेदीसंदर्भात नवी नियमावली जारी केली असून त्यानुसार १८ वर्षाखालील ग्राहक कोणत्याही टेलिकॉम ऑपरेटर कडून सीम खरेदी करू शकणार नाहीत. कुणाही टेलिकॉम ऑपरेटरने अशी विक्री करणे नियमबाह्य मानले जाणार आहे आणि असे सीम कार्ड अवैध ठरणार आहे.

नवीन सीम घेताना ग्राहकांना कस्टमर अॅक्वीसिझन फॉर्म भरावा लागतो. टेलिकॉम कंपनी आणि ग्राहक यांच्यातील हा फॉर्म एक प्रकारचा करार असतो. या फॉर्म मध्ये नवीन नियमानुसार सुधारणा केली गेली आहे. त्यात १८ वर्षाखालील ग्राहक तसेच मानसिक स्थिती ठीक नसणारे ग्राहक सीम खरेदी करू शकणार नाहीत. एक व्यक्ती जास्तीत जास्त किती सीम खरेदी करू शकते याचे उत्तर १८ सीम असे असले तरी त्यातील ९ सिमचा वापर मोबाईल कॉल्ससाठी आणि अन्य ९ सीमचा वापर मशीन टू मशीन कम्युनिकेशन साठी करता येतो.

सीमकार्ड खरेदी करताना आता ग्राहकाला प्रत्यक्ष दुकानात जाण्याची आवश्यकता नाही. डिजिटल केवायसी देऊनही ही खरेदी होऊ शकणार आहे. तसेच पोस्ट पेडचे प्रीपेड करताना सुद्धा कागदपत्राची गरज राहणार नाही. नेटवर्क प्रोव्हायडर कंपनीच्या माध्यमातून युजर स्वतः केवायसी करू शकणार असून त्यासाठी फक्त १ रुपया शुल्क भरावे लागणार आहे.