भारताला हवा असलेल्या जाकीर नाईकला हवी अशी सून

धार्मिक तेढ माजविण्याच्या आरोपावरून भारताला हवा असलेला आणि मलेशियात पळून गेलेल्या जाकीर नाईक याने त्याच्या मुलासाठी कशी वधू हवी या संदर्भातील एक पोस्ट फेसबुकवर केली आहे. यात तो म्हणतो, ‘फरिक साठी चांगल्या चारित्र्याची मुस्लीम मुलगी हवी आहे. माझा मुलगा आणि त्याची पत्नी एकमेकांची ताकद असावेत. अशी मुलगी जर तुमच्या घरात असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यावे.’

ही पोस्ट बरीच मोठी आहे. त्यात जाकीरने स्वतःची, मुलाची आणि कुटुंबाची माहिती दिली आहे आणि योग्य मुलीचा बायोडाटा पाठवावा असे म्हटले आहे. ग्राफिक्स मध्ये मात्र त्याने मुलाचा नाही तर स्वतःचा फोटो दिला आहे. होणाऱ्या सुनेसाठी त्याच्या अनेक अटी आहेत. मुलगी कोणत्याही इस्लामी संघटनेबरोबर जोडलेली असावी, कुरान, हदीस मध्ये सांगितलेल्या मार्गाने जाणारी, वाईट कामांपासून दूर राहणारी, धार्मिक हवी. तिने इस्लामी शिक्षण प्रसार करायला हवा. अलिशान, ऐषारामी आयुष्यापासून दूर, सामान्य जीवनावर विश्वास ठेवणारी, इंग्रजी बोलता येणारी आणि मलेशियात राहण्याची तयारी असलेली हवी.

विशेष म्हणजे या पोस्ट वर जाकीरला कॉमेंट येत असून त्यातील बऱ्याच कॉमेंट’ अशी मुलगी कुठेच मिळणार नाही’ अश्या आशयाच्या आहेत असे समजते.