चीनी मोबाईल देशाबाहेर काढणार लिथुएनिया

लिथुएनिया देशाने चीनी स्मार्टफोन्स देशाबाहेर करण्याची तयारी सुरु केली आहे. लिथुएनियाच्या रक्षा मंत्रालयाने चीनी स्मार्टफोन खरेदी करू नका आणि ते पूर्वीच खरेदी केले असतील तर फेकून द्या अशी शिफारस देशवासियांना केली आहे. यामुळे मेड इन चायना स्मार्टफोन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या सरकारी रिपोर्टनुसार फोन आणि अन्य डिव्हायसेसच्या माध्यमातून चीनी सेन्सॉरशिपचा धोका निर्माण झाला आहे. लिथुएनियाच्या रक्षा मंत्रालयाने यापूर्वीही असे आरोप केले आहेत. देशाच्या सायबर सुरक्षा संस्थांच्या म्हणण्यानुसार दिग्गज चीनी कंपनी शाओमी कॉर्प युरोप मध्ये विकल्या जाणाऱ्या फ्लॅगशिपफोन मध्ये ‘फ्री तिबेट, लॉंग लिव तैवान इंडिपेंडन्स, डेमोक्रसी मुव्ह’ असे शब्द शोधणारे सेन्सर चीप मध्ये बसवत आहे.

शाओमी मी १० टी फाईव्ह जी फोन सोफ्टवेअर क्षमता युनियन क्षेत्रासाठी बंद केली गेली होती मात्र ती परत कधीही सुरु होऊ शकते असेही सांगितले जात आहे. त्यामुळे देशवासीयांनी नवे चीनी स्मार्टफोन खरेदी करू नयेत आणि जुने फेकून द्यावेत अशी आमची शिफारस आहे असे रक्षा मंत्रालयाचे उपमंत्री मार्गिरेस अबुके यांनी म्हटले आहे.