इम्रान खानसह पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या स्नेहा दुबेचे पुण्याशी आहे खास नाते


आज संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पाकिस्तानला भारताने चांगलीच फटकार लगावली आहे. भारताने संपूर्ण जगाला पाकिस्तान हा दहशतवाद्यांना आश्रय देणारा आणि अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारा देश असल्याचे सांगत पाकिस्तानचे पितळ उघडे पाडले आहे. भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांवरुन पाकिस्तानवर एका अर्थाने शाब्दिक सर्जिकल स्ट्राइक केला आहे.

स्नेहा दुबे भारताच्या या शाब्दिक सर्जिकल स्ट्राइकचे नेतृत्व करत होत्या, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेतील स्नेहा या भारताच्या पहिल्या महिला सचिव आहेत. जाळपोळ करणारा हा देश स्वत:ला फायर फायटर म्हणवून घेतो. पाकिस्तान आपल्या प्रदेशामध्ये दहशतवाद्यांना आश्रय देतो. असे करण्यामागे त्यांना एकच अपेक्षा असते की यामुळे त्यांच्या शेजारच्या देशाला हानी पोहचवता येईल. या लोकांच्या धोरणांमुळे आमच्या प्रदेशालाच नाही, तर संपूर्ण जगाला त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे असे वागताना दुसरीकडे त्यांच्या देशातील हिंसक घटना ते दहशतवादाचा आम्हाला फटका बसला, असे म्हणत लपवू पाहत आहेत, अशा तिखट शब्दांमध्ये भारताच्या या महिला अधिकाऱ्याने पाकिस्तानला आरसा दाखवण्याचे काम करत त्यांची दुटप्पी भूमिका जगासमोर आणली.

सध्या संपूर्ण जगभरामध्ये स्नेहा यांच्या या भाषणाची चर्चा आहे. स्नेहा यांचे सोशल नेटवर्किंगवरही कौतुक होताना दिसत आहे. जागतिक मंचावर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे प्रतिनिधित्व करताना अगदी आत्मविश्वासाने आणि संयमी शब्दांमध्ये स्नेहा यांनी पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला, त्या गोष्टीचे कौतुक केले जात आहे. अनेकांनी एवढ्या कमी वयामध्ये स्नेहा यांनी केलेली कामगिरी फारच कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.

२०१२ च्या बॅचच्या आयएफएस म्हणजेच इंडियन फॉरेन सर्व्हिसच्या स्नेहा या अधिकारी आहेत. गोव्यामधून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले असून पुण्यातील फर्ग्युसन कॉलजेमधून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर दिल्लीमधील पंडित जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधून त्यांनी एमफीलचे शिक्षण घेतले आहे.

स्नेहा यांनी वयाच्या १२ व्या वर्षांपासूनच इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये काम करायचा निश्चय मनाशी बाळगला होता. यासाठी आवश्यक असणारी केंद्रीय आयोगामार्फत घेण्यात स्पर्धा परिक्षा त्यांनी दिली आणि त्या पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या. त्या २०११ मध्ये परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

जागतिक घडामोडींबद्दल जाणून घेण्याची इच्छा, नवीन संस्कृतींबद्दल जाणून घेण्याची आवड, देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी, देशासाठी धोरण ठरवण्यासाठी देता येणारे योगदान आणि लोकांची मदत करण्यासाठी मिळणारी संधी यासारख्या गोष्टींमुळेच आपण या क्षेत्रात आल्याचे स्नेहा सांगतात.

भटकंतीची प्रचंड आवड असणाऱ्या स्नेहा यांनी आयएफएस अधिकारी होऊन आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची सर्वोत्तम संधी आपल्याला मिळाल्याचे स्नेहा सांगतात. सरकारी सेवेमध्ये रुजू झालेल्या स्नेहा या त्यांच्या कुटुंबातील पहिल्याच सदस्या आहेत. त्यांचे वडील एका खासगी बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करतात, तर आई शिक्षिका आहे.

परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर २०१२ साली त्यांची पहिली पोस्टींग परराष्ट्र मंत्रालयामध्ये झाली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१४ रोजी त्यांना माद्रिदमधील भारतीय दुतावासामध्ये नियुक्त करण्यात आले. सध्या त्या संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या पहिल्या महिला सचिव म्हणून कार्यरत आहेत.