रोहित पवारांचा सरकारला आरोग्य विभागाची परीक्षा रद्द प्रकरणी घरचा आहेर


अहमदनगर : राज्य सरकारवर आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या हॉल तिकीटांमध्ये घोळ झाल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. अचानक परीक्षा रद्द झाल्या हे अत्यंत चुकीचे असून लवकरात लवकर परीक्षा घेण्यात याव्या, वेळ पडली, तर वरिष्ठ अधिकारी नेमा परंतु युवकांच्या भविष्याशी कोणतेही सरकार असो त्यांनी खेळू नये, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्याच महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर देत तीव्र नाराजी व्यक्त केली.

राज्य सरकाराला हॉल तिकीटांमध्ये घोळ झाल्यामुळे परिक्षा रद्द करावी लागली. या विषयावर पत्रकारांशी बोलत असताना रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांचे हाल झाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली. हॉल तिकीटांमध्ये गोंधळ झाल्यामुळे आरोग्य विभागाला आपली परीक्षा रद्द करावी लागली आहे. परीक्षा न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यामुळेच रद्द करावी लागली आणि यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. परीक्षा अचानक रद्द झाल्या हे अत्यंत चुकीचे असून एक कंपनीमुळे जर युवकांना अडचणी येणार असतील तर त्या आमच्यासारख्या युवा आमदारांना चालणार नाही, असे रोहित पवार म्हणाले. तसेच, लवकरात लवकर परीक्षा घेण्यात याव्या, वेळ पडली तर वरिष्ठ अधिकारी नेमा परंतु युवकांच्या भविष्याशी कोणतेही सरकार असो त्यांनी विद्यार्थ्यांसोबत असे खेळू नये, असेही रोहित पवार म्हणाले.

अशा परीक्षांना विद्यार्थी येत असतील त्यांचा येण्या जाण्याचा खर्चही शासनाने करावा, अशी मागणीही पवार यांनी केली. दरम्यान न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा रद्द करावी लागली आणि यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच, परीक्षांची तारीख येत्या 8 ते 10 दिवसांत ठरवून नवीन तारीख जाहीर केली जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परिक्षार्थींची माफी मागितली.