28 सप्टेंबर रोजी कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश


नवी दिल्ली – येत्या 28 सप्टेंबर रोजी जेएनयूचे माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेते कन्हैया कुमार काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. त्यांचा पक्षप्रवेश सोहळा काँग्रेसच्या मुख्यालयात होणार आहे. यावेळी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी देखील काँग्रेसची सदस्यता घेणार असल्याचे सुत्रांकडून कळते.

पक्षात मोठा बदल करण्याचा निर्णय एकापाठोपाठ एका निवडणुकीत पराभव स्वीकारणाऱ्या काँग्रेसने घेतला आहे. आता विधानसभा निवडणुकीसह लोकसभा निवडणुकीवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केल आहे. आगामी काळात भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून जातीच्या समिकरणांसह युवा चेहऱ्यांना संधी देण्यात येत आहे. युवा नेते कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांना पक्षात सामील करून घेणे हा 2024 च्या निवडणुकीच्या तयारीचा भाग असल्याचे समजते.

बिहारमधील बेगुसराय येथून कन्हैया कुमारने 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. पण कन्हैया यांचा भाजपच्या गिरीराज सिंह यांच्याकडून पराभव झाला. दुसरीकडे जिग्नेश मेवानी आमदार असून 2017 मध्ये काँग्रेसने त्यांच्याविरुद्ध उमेदवार दिला नव्हता. गुजरातमध्ये ७ टक्के दलित मतदार असून काँग्रेसला याचा निश्चित फायदा होऊ शकतो.